Thursday 7 February 2013

खोट्या पंडिताची कथा

निश्चयी विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला, त्याने ते शव खाली उतरवले, आपल्या खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालायला लागला. तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ त्याला म्हणाला, ‘‘राजन्, तू सर्व तर्‍हेच्या सुखांचा उपभोग घेतलेला आहेस, कोणतेही सुख बाकी राहिलेले नाही. असं असताना ते सुखी जीवन नाकारुन तू इतके परिश्रम कां करीत आहेस? प्रेत उचलण्याचे हीन काम कां करतो आहेस? तेही तू निष्ठेने व इतक्या चिकाटीने कशासाठी करतो आहेस? तुझा कुणी एखादा स्पर्धक आहे कां, कीं त्याला हरवण्यासाठीं तूं हे सारं कांही करतो आहेस? तसं असेल तर सावध हो. कारण वीर नांवाच्या एका महा- पंडिताने मदन नांवाच्या एका खोट्या पंडिताशी स्पर्धा केली आणि त्याला अपमानित व्हावे लागले.
मी तुला तीच गोष्ट सांगतो. म्हणजे तुला थकवाही जाणवणार नाही’’ आणि वेताळ त्या पंडिताची गोष्ट सांगू लागला. ग्रमाधिकारी पारिजाताला लोकांनी आपल्याला महापंडित म्हणावे अशी तीव्र इच्छा होती. म्हणून तो दररोज आपल्या गांवात सभा भरवून तिथें वेदपुराणांवर प्रवचन वा चर्चा करी. गांवकरी त्याला प्रश्न विचारीत आणि तो त्यांना उत्तरें देई. हा सभेचा रोजचा परिपाठ होता.
एकदा मदन नांवाचा एक तरुण कांहीतरी कामानिमित्त त्या गांवात आला. संध्याकाळी असलेल्या या सभेला तोही उपस्थित राहिला. त्या दिवशी पारिजात गजेंद्रमोक्षाची कथा गांवकर्‍यांना सांगत होता. कथा संपल्यानंतर एकाने प्रश्न विचारला, ‘‘द्रौपदीला पांच पती होते. मग तिला पतिव्रता कसे मानता येईल?’’
पारिजातने हंसत उत्तर दिले, ‘‘तुमच्या प्रश्नांतच याचं उत्तर आहे.’’ दुसर्‍या एका गांवकर्‍याने विचारले, ‘‘रामाने विनाकारण सीतेला अरण्यांत सोडून दिले. ह्याला आदर्श पती कसा म्हणता येईल?’’ ‘‘ही गोष्ट सीतेने सांगितली ना, मग सीतेनेच याचं उत्तर दिलं पाहिजे.’’ पारिजातने समर्थन केलं.
आणखी एकाने शंका व्यक्त केली, ‘‘शिवानेच नृत्याची निर्मिती केली आहे. तरीदेखील या कलेचा पुरुषांपेक्षां स्त्रियाच जास्त अभ्यास करतात. असं कां?’’ ‘‘हा तर निसर्गाचा नियम आहे. कमावतो पुरुष पण खर्च करते स्त्री!’’ पारिजातने उत्तर दिलं. असे कितीतरी प्रश्न विचारले गेले. मदनला मात्र आश्चर्य वाटलं कीं कथा होती गजेंद्र-मोक्षाची, पण त्याबद्दल कुणीच कांही विचारलं नाही.
पारिजातची असंबद्ध उत्तरें ऐकूनही तो जरा चक्रावला. कारण कोणत्याच प्रश्नाचं सरळ उत्तर दिलेलं नव्हतं. तरीही गांवकरी उत्तरें ऐकून खूष दिसत होते.
वीर मदनचा दूरचा नातेवाईक होता. तो पारिजातपेक्षां जास्त चांगली चर्चा करुं शकत असे. त्याची भाषा सरळ, सोपी व उत्तरेही सुसंगत असत.
मदनला वाटलं कीं वीरला या गांवात बोलावलं तर चांगलं होईल, कारण श्रोते कथा-प्रवचने ऐकायला उत्सुक दिसत होते. त्याने हा प्रस्ताव पारिजात समोर मांडला व म्हणाला, ‘‘महोदय, आपल्या सभा फारच छान होतात. आपली अनुमती असेल तर मी वीरला या गांवात यायचे निमंत्रण देईन. तो माझा दूरचा नातेवाईक आहे आणि तो जरुर येईल. तोही एक मोठा विद्वान आहे.’’
‘‘मोठे मोठे विद्वान कोणत्याही सभेत आले कीं सभा चांगलीच होते. तुमचा वीर तेवढ्या ताकदीचा आहे ना?’’ मदनने विचारले.
‘‘ते मला सांगता येणार नाही. परंतु त्यालाही एकदा राजसत्कार मिळालेला आहे.’’ मदन म्हणाला. वीर खरंच पारिजातपेक्षां हुशार आहे असं कांही त्याला सांगायचं नव्हतं.
‘‘राजसत्कार मिळण्यासाठी विद्वत्तेपेक्षां दरबारांतल्या लोकांशी परिचय व वशिलाच जास्त आवश्यक असतो. पण असल्या लोकांचं खरं स्वरुप कळतं अशा लहानमोठ्या सभांतूनच! त्यांची प्रतिभा इथें दिसून येते. वीरला जरुर बोलवा!’’ पारिजातने आश्वासन दिलं.
मदन जेव्हां आपल्या गांवी परत गेला तेव्हां त्याने वीरला ही गोष्ट सांगितले. त्यावर वीर म्हणाला, ‘‘मला खरंच आश्चर्य वाटतं कीं आसपासच्या गांवातून अशा चर्चा, प्रवचने ऐकण्यासाठी लोक खरोखरीच उत्सुक आहेत. मी अवश्य पारिजातला भेटायला जाईन.’’
कांही दिवसानंतर मदन आणि वीर पारिजातच्या गांवी गेले. जी पंडित सभा आयोजित केली गेली, त्यांत वीरने गजेंद्रमोक्षाची कथा मोठ्या रंजकतेने सांगितली. पारिजातचे कथाकथन आणि वीरचे कथन यांत कितीतरी फरक आहे हे मदनला स्पष्टपणें कळून चुकले. गांवकर्‍यांपैकीं मात्र कुणीही त्यानंतर प्रश्न विचारले नाहीत.
‘‘म्हणजे याचा अर्थ असा होतो कीं या प्रवचनांत गांवकर्‍यांना कांही शंका उरल्या नाहीत. वीरने सुबोध कथन केले नि त्यांच्या शंकेला जागाच ठेवली नाही.’’ मदन पारिजातला म्हणाला.
‘‘असं नाही. मी जेव्हां कथाकथन करतो, ते गांवकर्‍याना अगदी चांगलं समजतं. म्हणून तर ते शंका उपस्थित करतात. आता मी त्यांना रुक्मिणी विवाहाची कथा सांगतो. तूच पहा, ते नंतर किती प्रश्न विचारतात ते!’’ पारिजात म्हणाला. आणि त्याने गांवकर्‍यांना रुक्मिणीविवाहाची कथा सांगितली. एका पाठोपाठ एक असे गांवकरी उठून आपापल्या शंका विचारुं लागले. पण ते सारे प्रश्न ऋष्यशृंगाबद्दल होते. पारिजातने जी उत्तरें दिली ती पूर्वीप्रमाणेंच अर्थहीन होती.
त्यावर आश्चर्य व्यक्त करुन वीरने मदनला विचारले, ‘‘या लोकांनी कथा ऐकली रुक्मिणी विवाहाची, आणि प्रश्न विचारताहेत ऋष्यशृंगा-बद्दल! हे अगदीच विचित्र वाटतंय. पूर्वीही असंच होत होतं असं तू म्हणाला होतास. तेव्हां मला तरी वाटतं कीं हे गांवकरी आणि पारिजात एकतर पार पोंचलेले असतील, किंवा ठार मूर्ख! जेव्हां खरी पंडित सभा दुसर्‍या एखाद्या गांवी घेतली जाईल, तेव्हांच या समस्येचे निराकरण होऊं शकेल.’’
मदनने पारिजातला हे सांगितले नाही व त्याची तोंडभरुन स्तुती केली. नामवर गांवात असेच कथाकथन करण्यासाठी मदनने गोड बोलून पारिजातला राजी केले.
नामवरमधें सभा ठरली आणि बरेच लोक त्या कार्यक्रमाला आले. वीरने कुंतीची कथा सांगितली आणि श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक ऐकली. पण जेव्हां पारिजातने भक्त प्रल्हादाची कथा सांगितली तेव्हां त्यानंतर श्रोत्यांनी वामनावताराबद्दल प्रश्नांचा भडिमार केला. पहिल्यासारखीच अर्थहीन उत्तरें पारिजातने दिली.
वीरला हे अगदीच विचित्र वाटत होते. त्यानंतर निशापूरमधें आणखी एक कार्यक्रम झाला. तिथेही हाच प्रकार घडला. वीरची कथाकथनाची पद्धत श्रोतृवर्गांत उत्साह निर्माण करुं शकली नाही, त्यामुळें वीर जरा निराश झाला. शेवटचा आणखी एक प्रयत्न म्हणून त्याने एक सभा जागृतीपुरांत आयोजित करण्याचे ठरवले.
यापूर्वीं जागृतीपुरांत वीरचा भव्य सत्कार झालेला होता. त्या गांवातले जाणकार लोक त्याला पारिजातपेक्षां जास्त श्रेष्ठ पंडित मानतील आणि त्याचा आदर राखतील अशी अशा त्याला वाटत होती. सभेची जुळवाजुळव करण्यासाठीं वीरने मदनला जागृतीपूरला धाडले. जेव्हां मदन तिथल्या ग्रमाधिकार्‍याला भेटायला गेला, तेव्हां तो अधिकारी नाराजीने म्हणाला, ‘‘आम्ही वीरचा सत्कार केला म्हणून कांही लोकांना वाईट वाटते आहे कां? कीं ही चूक आहे असं वाटतंय? तसं असेल तर वीरने या गांवात येणे हे त्याच्या दृष्टीने ठीक होणार नाही.’’
‘‘महाशय, वीरच्याबाबतीत आपला कांही-तरी गैरसमज दिसतो आहे. पारिजातने सभा जिंकली असं लोक म्हणतात म्हणून आपण वीरबद्दल अनादर दाखवता आहात. पण त्याचं खरं कारण आहे गांवकर्‍यांचे अज्ञान! त्यांच्या अडाणीपणाची फायदा घेऊन पारिजात आपल्या बुद्धिमत्तेची शेखी मिरवतो. त्याच्या भ्रमाचा भोपळा फक्त जागृतीपुरांतल्या गांवकर्‍यांमधेंच फुटण्यासारखा आहे. पारिजातची खरी परीक्षा करण्यासाठीच ही सभा आम्हाला तुमच्या गांवात करायची इच्छा आहे.’’ त्यावर ग्रमाधिकारी चिडून म्हणाला, ‘‘पुन्हां पुन्हां तेच तेच काय सांगता आहात? पारिजात हा कांही विद्वान नाही, हे आम्हाला माहीत आहे, त्याच्यांत नांवापुरती देखील विद्वत्ता नाही. त्याला मात्र स्वतः महापंडित असल्याचा आव आणता येतो. म्हणून तो नेहमी आपलीच आख्याने ठरवतो. तो ग्रमाधिकारी आहे आणि आपल्या अधिकाराच्या जोरावर तो त्याच्या लोकांना मदत करुं शकतो. जे त्याला आवडत नाहीत, त्यांना तो त्रास देऊं शकतो, त्यांचे नुकसान करुं शकतो. म्हणून गांवकरी त्याच्याशी गोडीगुलाबीने वागून त्याची नाटकी स्तुती करतात. असले स्तुतीपाठक लोक त्याच्या सभांना लाचारीने, नाईलाजाने जातात. ज्या गांवात त्याची सभा असते, तिथे हे लोकही बरोबर जातात. आपली उपस्थिती त्याला जाणवून देण्या साठी ते उगीचच प्रश्न विचारतात. पारिजातच्या यशस्वी सभांचं हे खरं कारण आहे.’’
हे ऐकून मदन चक्रावला. त्याने ग्रमाधिकार्‍याला म्हटलं, ‘‘साहेब, हे बरोबर आहे, पण हे लोक पारिजातच्या कथेबद्दल प्रश्न न विचारता इतर अनावश्यक प्रश्न कां विचारत बसतात?’’
ग्रमाधिकार्‍याने जास्तच चिडून उत्तर दिलं, ‘‘अहो, पारिजातच्या कथा ऐकायला आमचे गांवकरी उत्सुक नसतात.
उगीच डोकेदुखी निर्माण होते. म्हणून ते नुसते बसून राहतात. त्याचे आख्यान संपले रे संपले कीं त्यांच्या मनांत इतर जे विषय घोळत असतात, त्याच्याबद्दल ते विचारीत राहातात. आणि खरं पाहिलं तर पारिजातलाही त्या प्रश्नांची उत्तरें ठाऊक नसतात. गांवकर्‍यांनादेखील ठाऊक असतं कीं त्याच्याकडून नीट उत्तर मिळणारच नाही. म्हणून ते प्रत्येक उत्तराला ‘‘वा छान’’ म्हणून माना डोलावतात.’’

ही गोष्ट सांगून वेताळने आपली शंका व्यक्त करीत विक्रमार्काला विचारले, ‘‘राजन्, जागृतीपुरच्या ग्रमाधिकार्‍याला पारिजातच्या बाबतीत सारी माहिती आहे. आपल्याला पंडित म्हटले जावे म्हणून त्याने काय काय नाटकें केली, थापा मारल्या, हे त्याला ठाऊक आहे. हे माहिती असून देखील त्याने वीरची सभा बोलावण्या-बाबत नकार दर्शवला. हा वीरसारख्या पंडिताचा अपमान नाही कां? ज्या गांवात वीरचा सत्कार झाला, त्याच गांवात वीरची सभा होऊं नये? त्याच्यावर हा राग कशासाठी? ग्रमाधिकार्‍याची चीड कशापायी आहे? माझ्या या शंकांचं उत्तरं माहीत असूनही जर तू मौन पत्करलेस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील.’’

विक्रमार्काने उत्तर दिले, ‘‘जागृतीपुरचा ग्रमाधिकारी वीरचा आदर करणारा आहे. त्याच्या मनांत वीरबद्दल नितांत प्रेम व कौतुक आहे. म्हणूनच त्याला वीरची सभा गांवात घ्यायची नाही आहे. पारिजातबरोबर वीरचेही कथाकथन ठेवणे हा उलट वीरचाच अपमान आहे. त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. वीर हुशार आहे पण त्याला धोरण कमी आहे. नाटकी पंडितांच्या या असल्या चाली त्याला समजत नाहीत. लोकांचा पवित्रा, खोटेपणा हा त्याला अजून नीट ओळखता येत नाही. म्हणूनच त्याने पारिजातच्या सभेंत भाग घेऊन दर वेळी हार मानली. जागृतीपुरच्या ग्रमाधिकार्‍याला वीरसाठी आणखी एक पराभव नको होता, खोट्या पंडिताशी चुरस नको होती. तसं केल्यामुळें वीरच्या आजपर्यंतच्या कीर्तीला काळिमा लागला असता.

यांत ग्रमाधिकार्‍याची मुळींच चूक नाही, किंवा त्याने जाणूनबुजून वीरचा अपमानही केलेला नाही. जो कांही विचार त्याने ठरवला. त्यांत वीरची भलाईच होती. कारण कांहीही असो, दुष्ट व खोट्या माणसांपासून लांब राहाणे हे केव्हांही श्रेयस्कर असते.’’

No comments:

Post a Comment