Friday 8 February 2013

बेडूक फुगला म्हणून बैल होत नाही

स्वत:च्या क्षमतेपेक्षा भरमसाठ वल्गना करणार्‍याबद्दल वरील म्हण मराठीत वापरली जाते. कन्नड मधे, कदाचित ही फारच अतिशयोक्ती वाटल्यामुळे, आणखी एक म्हण प्रचलित झाली ती ‘बेडूक-बैला’ ऐवजी ‘कोल्हा-हत्ती’ घेऊन; म्हण आहे – “कोल्हा कितीही मोठा झाला तर काय हत्ती एवढा होईल?” नंतर हेही अतिशयोक्त वाटल्यामुळे शेवटी कन्नडमध्येच म्हण रूढ झाली “म्हैस मोठी झाली म्हणून काय हत्तीसारखी होईल!” आता बोला! तसे मल्याळम मधे कन्नड मधील सुरुवातीस सांगितलेली म्हण येते पण बेडकाच्या जागी खारीला घेऊन. म्हण आहे “खार फुगली तर तिचा काय हत्ती होणार आहे!” ह्याचा अर्थ मल्याळम मध्ये बेडकाला ‘स्पेअर’ केला असे मुळीच नाही; मल्याळम मधेच म्हण आहे “बेडकाच्या उडीने काय तलावाला पूर येईल?” एकंदरीत पाहता असे लक्षात येते की ह्या अर्थाच्या म्हणींमध्ये पुन्हा एकदा ‘अखिल भारतीय जंगल-बुक” पाहायला मिळते.

———————————

हिंदीत म्हटले जाते “उंदराच्या चामडे काय नगार्‍याला वापरायचे?” तर राजस्थानातल्या हिंदीत म्हण आहे “मुंगी तिच्या आईला म्हणते – मी गुळाची ढेप आणू?” किंवा “मांजराचा गू काय सारवायला वापरणार?” उर्दू मधे म्हण आहे “तीन पायांची गाढवीण आणि नऊ मणाचा बोजा” किंवा “विंचवाचा मंत्र माहीत नाही आणी सापाच्या बिळात हात घालतोय” काश्मिरीमधे म्हणतात “कोंबडा कधी बारा ‘त्रखाचा’ होईल का? (एक त्रख = पाच शेरांपेक्षा थोडे जास्ती वजन)” मराठी मधे बेडका व्यतिरिक्त आणखीही प्राण्यांवर अशा म्हणी बेतल्या आहेत. उदा: “ऊ विईल काय आणि लिख पिईल काय?” किंवा मालवणीमधील “गांडूळ असून सश्याच्या मुलीशी लग्न करायचे म्हणतो!”

———————————-

तिकडे पूर्वेकडील बांग्लामधे “वाळवीचा ढिगार्‍याचा डोंगर होईल काय?” किंवा “गांडूळ पकडता येत नाही आणि साप पकडायला जातो” उडिया मधे उर्दू प्रमाणेच “विंचवाचा मंत्र माहीत नाही आणी सापाच्या बिळात हात घालतोय” असे सांगितले आहे 

दक्षिणेतील भाषांपैकी तमिळमधे “उंच उडता आले म्हणून काय चिमणीचा गरुड होईल” अशी म्हण आहे तर तेलगुमधे “कुत्रा कितीही मोठा झाला म्हणून काय ओझ्याच्या गोणी वाहील?” किंवा “कावळा मोठा झाला तरी काय महालाच्या खांबां एवढा होईल?” असे सांगितले आहे तर कन्नडमधे “बेडूक फुगला म्हणून हत्तीला गिळेल काय?” असे शीर्षकातील म्हणीचे अतिशयोक्त रूप सांगितले आहे. तसेच “कोल्ह्याची कोल्हेकुई काय डोंगरावर ऐकू येणार आहे?” अशीही एक म्हण कन्नडमध्ये आहे, मल्याळम मधे तर “माशी उडाली तरी काय दोन कोस जाईल?” किंवा “कावळा उंच उडला तर काय तो गरुड होईल?” किंवा “डासाच्या फुंकरीने दिवा विझेल काय?” किंवा “मांजरीने झेप घेतली म्हणून काय तीचा वाघ होईल?” किंवा “काजव्याच्या प्रकाशाने काय अंधार नाहीसा होईल?” किंवा “सशाने कितीही जोर लावला तरी तो हत्त्ती इतकी लीद देईल काय?” अशा अनेकविध म्हणींचे ‘पंचतंत्र’ करून टाकले आहे.

————————————————————

अर्थात प्राण्यांचा उल्लेख नसलेल्या पण हाच आशय सांगणार्‍या म्हणीही भरपूर आहेत आणि मजेशीरही आहेत. उर्दूमध्ये म्हण आहे “डोळे नाहीत आणि भरतकाम करायला निघाली” मराठीत म्हणतात “अंगठा सुजला म्हणून काय डोंगराएवढा होईल?” तर गुजरातीमध्ये म्हणतात “बोट सुजले म्हणून काय खांबाएवढे होईल?” तिकडे उडीयात व मल्याळम मधे म्हणतात “करंगळी सुजली तर काय अंगठ्या एवढी होईल?” किंवा कन्नड मधील म्हण “चाकू कितीही धारदार असला तरी काय झाड कापेल?” जशी हिंदीमध्ये म्हण आहे “नहरनी (नेल कटर) कितीही धारदार असली तर काय झाड कापेल?” तशीच ती गुजरातीमध्ये आहे “नहरनी (नेल कटर) कितीही धारदार असली तर काय मुंडके उडवेल?”

———————————————

स्वत:च्या क्षमतेपेक्षा अधिक बढाई मारणार्‍या कोणाचाही आपल्याला तिटकाराच येतो. तो तिटकारा तिखटपणे व्यक्त करणार्‍याही काही म्हणी आहेत. उदा: तमिळ मधे म्हण आहे “नाली पार न करणारा समुद्र काय पार करणार?” किंवा “तांदुळातला खडा न उचलणारा मंदिराची शिळा काय उचलणार?” आता कहर म्हणजे राजस्थानच्या हिंदीतली ही म्हण पाहा “पादण्याची शक्ती नाही अन् म्हणे तोफखान्यात भरती करा!” आहे की नाही मजा

संदर्भ: भारतीय कहावत संग्रह, स्व. विश्वनाथ नरवणे
——————————————————

No comments:

Post a Comment