Thursday 7 February 2013

माझा प्रवास... ( संजय राउत )

पत्रकारिता हे क्षेत्र तसं अनेकांच्या आकर्षणाचा विषय. लिखाणामुळे तुमचं नाव लोकांपर्यंत पोहोचणं, अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या ओळखी होणं आणि समाजात स्वतःचं स्थान निर्माण होणं या सगळ्याच दृष्टीने पत्रकारितेचं क्षेत्र आता अनेकांना खुणावू लागलं आहे.
य़ाच पत्रकारितेत तर वर्षानुवर्ष लोक उपसंपादक किंवा वार्ताहर म्हणून काम करतात. मग मुख्य उपसंपादक, सहसंपादक अशा पायरी-पायरीने पुढे जातात. सगळ्या अनुभवातून तावून सुलाखून बाहेर पडतात आणि मग कुठे संपादकांची खुर्ची त्यांना बहाल केली जाते पण आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करुन, आपल्या वेगळ्या लेखनशैलीने, स्वतःचं वर्चस्व सिध्द करुन थोड्य़ाच काळात एका दैनिकाच्या कार्यकारी संपादकपदी पोहोचलेले आणि तर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेले दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत. अगदी लहान वयात हे सगळं अनुभवण्यासाठी आणि यशस्वीपणे मार्गक्रमण करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास संजय राऊत यांच्याकडे आहे. म्हणूनच तर ही वाटचाल ते ठामपणे करु शकले.
ते म्हणतात, "जर कोणतंही काम मनापासून केलं तर काहीही करता येतं आणि वयाचं म्हणाल तर मी अगदी शाळेत असल्यापासून ‘मार्मिक’मध्ये लिखाण करतोय. त्यामुळे जवळजवळ तेव्हापासूनच माझा हळूहळू वृत्तपत्रसृष्टीशी संबंध आला."
तसा वृत्तपत्राशी त्यांचा संबंध लहानपणापासूनच आला. कारण रोजचं वर्तमानपत्र वाचण्याची सवय अगदी लहान वयात त्यांना लागली. ‘मार्मिक’ तर त्यांच आवडतं साप्ताहिक होते. तेव्हा इतर माध्यमंही फ़ारशी प्रभावी नसल्यामुळे वर्तमानपत्राला किंमत होती. ग्लॅमर होतं. वर्तमानपत्रात साधं ‘वाचकांच पत्र’ छापून आलं तरी अप्रूप वाटत असे.
त्याच दिवसांत, संजय ८ वी / ९ वीत असताना त्यांनी ‘मार्मिक’मध्ये एक लेख लिहिला. तो लेख सगळ्यांनाच अतिशय आवडला. एक ६० / ७० वर्षांचे गृहस्थ त्या लेखाचं कात्रण घेऊन घरी आले. त्यांनी संजयच्या आईला विचारलं, " हा लेख लिहिणारे संजय राऊत कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय." छोटा संजय मुलांमध्ये खेळत होता. आईने त्याला हाक मारली. त्या छोट्या मुलाला पाहून त्या वृद्ध गृहस्थांना आश्चर्यच वाटलं. ते म्हणाले, "अहो, हा लेख वाचल्यावर लिहिणारी कुणी मोठी व्यक्ती असेल असं वाटंल होतं मला. छान, बरं वाटलं. पण तुम्हीही मला याच्या कामात कधीही अडवू नका, तो पुढे खूप मोठा होईल. " संजयची आई-सविताताई म्हणाल्या, " त्या आजोबांचे शब्द खरे ठरले. आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की, हा एवढा मोठा होईल, नावारूपाला येईल. आमच्यासारख्या सर्वसामान्य आईवडिलांच्या आणि सर्वसाधारण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर त्याची आजची कामगिरी निश्चितच मला कौतुकाची वाटते. त्यांच कौतुक केवळ बाहेरच्या कामगिरीबद्दलच नहि तर घरातही सगळ्यात मोठा मुलगा म्हणून त्याने आपली जबाबदारी नेहमीच पाळली. अगदी सर्वसाधारण परिस्थिती असूनही त्याने आपली वाट काढली हे विशेष."
संजय राऊत य़ांचं ४थी पर्यंतच शिक्षण अलिबागसारख्या ठिकाणी झालं. जिथून शाळेत जायलाचं मुळी पाऊणतास लागत असे. वडील कामाला मुंबईला असत. त्यामुळे ४थी नंतर मग सगळं कुटुंबच मुंबईत-घाटकोपरला राहायला आलं. तिथे हाऊसिंग बोर्डाच्या इमारतीत ते राहात होते. तिथलं राहणीमान फ़ारसं बरं नव्हतं. कधी कधी तिथल्या वातावरणात, तिथली मस्तिखोर मुलं याचे वाईट परिणाम होतील की काय याची भीती सविताताईंना वाटत असे. त्यामुळे शक्यतो आपल्या मुलांनी त्या मुलांमध्ये मिसळू नये असं त्यांना वाटे. प्रंसगी त्य मुलांना घरातच थांबायला लावत.
त्यातून ही मुलं आईला फ़ार घाबरायची. आईची शिस्त चारही मुलांना धाकात ठेवणारी होती. संजय घरातला मोठा मुलगा. त्याचा धाकटा भाऊ संदीप, मग सुनील आणि सगळ्यात धाकटी मीना. सगळीच मुलं आई-बाबांच्या सांगण्याविरूध्द कधीच गेली नाहीत. आजही सगळे भाऊ एकत्र-एकाच घरात राहतात. आज तर सगळ्यांचे संसार वाढलेत, पण तरीही एकाच छताखाली राहणं सगळ्यांनाच आवडतं.
लहानपणापासून आजपर्यंत सगळेच एकमेकांच्या मतांचा विचार करणारे आहेत. म्हणजे त्या लहान नकळत्या वयातली मस्तीही होती, पण संजयनी कधी मुलांबरोबर मारामारी केली, शाळेतून तक्रार आली असं कधीच झालं नाही. त्यातल्या त्यात धाकटा सुनील तसा मस्तिखोर होता. संजयच्या लहानपणातला एक प्रसंग सगळ्यांना आज अस्वस्थ करतो. एकदा संजय बैलगाडीतून पडला होता. चाक त्याच्या पायावरून गेलं होतं. बाकी सगळे घाबरले होते, पण तो मात्र धीटपणे त्या प्रसंगाला सामोरा गेला. हाच धीटपणा पुढे कदाचित पत्रकारितेत कायमचा कामी आला असावा. सविताताई म्हणाल्या, " लहानपणापासूनच आपलं मत तो ठामपणे मांडत असे. अगदी पुढे १९९२ च्या दंगलीच्या काळातही त्याचे ‘रोखठोक’ लेख येत असत तेव्हा आम्हालाही भीती वाटत असे, पण त्याला कधी भीती वाटली नाही. जे आहे ते ठामपणे मांडणं आणि मुख्य म्हणजे जो माणूस अडचणीत आहे, ज्याच्यावर अन्याय होतोय अशा व्यक्‍तींवरील अन्याय दूर करण्यासाठी आपल्या लेखणीचा त्याने जो उपयोग केलाय, तो मला तरी खूप महत्त्वाचा वाटतो. मला वाटतं लहानपणापासून त्याला जी वाचनाची आवड लागली त्यातूनच सगळा समग्र विचार करण्याची त्याची दृष्टी तयार झाली असावी. तेव्हा नेहमी लायब्ररीतून पुस्तकं आणायची, ती वाचायची, भाषणांना जायचं, रेडिओ ऐकायचा हाच नाद असे. त्या वाचनामुळे एक वेगळी प्रगल्भता त्याच्याकडे आली हे खरं आहे. पण या इतर वाचनाची त्याला एवढी आवड होती की तो अभ्यास सोडूनही वाचत बसे. अनेकदा अभ्यासाच्या पुस्तकात दुसरंच पुस्तक ठेवलेलं असायचं. अशा वेळी धाकट्या भावंडांना त्याच्यावर लक्ष ठेवायला मी सांगितलेलं होतंच. ती लगेच मला येऊन सांगत. त्यामुळे यावरून त्याने अनेकदा त्याने माझा ओरडा खाल्लेला आहे. मी त्याला म्हणत असे की, ‘ अरे, तू मोठा भाऊ आहेस, तू अभ्यास केलास तर इतर भावंडंही करतील.’ तेवढ्यापुरतं हो म्हणायचा. पण त्याला तो नादच होता वाचनाचा. म्हणजे अनेकदा मला आठवतंय. या मुलांना कधीतरी खाऊसाठी पैसे आम्ही द्‍यायचो. संजयला या पुस्तकांचा आणि लिखाणाचा एवढा छंद की , पुस्तकांसाठी पैसे त्याला नेहमीच कमी पडायचे, तर हा भावंडांशी गोड बोलून त्यांचे पैसे काढून घ्यायचा आणि त्याची पुस्तकं आणायचा, इतकं ते वेड होतं. आम्ही तर त्याला ओरडायचो कारण शिक्षणात तसं फ़ारसं लक्ष त्याचं नव्हतं. गणित विषय तर खूपच कच्चा. दहावीत असताना या गणितापायी तो तीन वेळा नापास झाला. त्यामुळे आम्ही त्याला म्हणायचो की, अरे, लेख लिहून पोट भरणार आहे का? शिक्षण घे. ते महत्त्वाचं आहे...पण आज त्याने स्वतःला सिध्द करुन दाखवलयं. लेख लिहूनही पोट भरता येतं हेही आम्हाला दाखवून दिलंय. जेव्हा २८ व्या वर्षी तो संपादक झाला तेव्हा हे सगळं जुनं आठवलं आणि डोळ्यात पाणी आलं."
आता तर राज्यसभेवर त्यांची नियुक्‍ती झाल्यावर लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या. रोज शुभेच्छांचे घरी येणारे फोन घेतानाही सविताताईंना भारावल्यागत झालं. त्या म्हणाल्या, "माणूस म्हणून संजय इतका चांगला आहे की दुस-याचं दु:ख त्याला बघवत नाही आणि कितीही दु:खाचा प्रसंग आला तरी तो अगदी शांत असतो. लहानपणापासूनच तो शांत आहे. त्यानेच काय, माझ्या कुठल्याच मुलाने, कधीच माझ्याकडे कशासाठीही हट्ट केलेला नाही किंवा उद्धटपणाही केला नाही. संजय तर सगळ्यात मोठा त्यामुळे घरातल्या मोठया भावाची जबाबदारी त्याने नेहमीच उत्तमरीत्या सांभाळील. आजही त्याची धाकटी भावंडं, त्याच्याशी चर्चा करुनच कोणताही निर्णय घेतात. आज माझी सगळी मुलं माझ्याजवळ आहेत. यापेक्षा वेगळं सुख ते कोणतं?"
माणूस जाणून घेणं, समोरच्याला घरातलं थोडंसं चळवळीचं वातावरणही कारणीभूत आहे.संजयचे वडील राजाराम राऊत कामगार होते. ते युनियनचं कामही करत असत. त्यामुळे सातत्याने घरात येणारी माणसं, कामगार चळवळीची होणारी चर्चा, कामगारवर्ग जागरुक व्हायला हवा ही नेहमी बोलली जाणारी भावना या सगळ्या गोष्‍टी त्यांच्या मनावर खोल बिंबल्या गेल्या. वर्तमानपत्रात या सगळ्याची होणारी चर्चा सातत्याने वाचली जायची. ‘मार्मिक’ मधलं राजकीय विश्‍लेषण आवर्जून वाचलं जायचं. शिवाय त्या काळातले लोकनेते यशवंतराव चव्‍हाण, बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं अनेकदा ऐकली जायची. म्हणूनच कदाचित समाजात चालणा-या अनेक घाडामोडींकडे सहजगतेने बघण्याची एक द्रुष्‍टी संजयकडे आली. आचार्य अत्रे हेही त्यांचं दैवत. त्यांचं वैचारिक साहित्यही त्यांनी वाचलेलं आहे. संजय म्हणतात, "महाराष्‍ट्राचा इतिहास ख-या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर आचार्य अत्रे यांचं क-हेचे पाणी-६ खंड प्रत्येकाने वाचले पाहिजेत. अत्रे उत्तम वक्‍ते होते. त्यांची लेखणी प्रभावी होती. शिवाय त्यांनी जे ‘मराठा’ वर्तमानपत्र सुरु केलं ते जनतेच्या पैशातून उभं राहिलं. असा एकूण चळवळीचा काळ होता तो. त्यामुळे त्याचे पडसाद अत्र्‍यांच्या लिखाणातून नेहमीच उठत असत. राहून राहून एका गोष्‍टीची मात्र खंत वाटते की, मी अत्र्‍यांना पाहिलं नाही आणि आज अत्रे हवे होते. अत्र्यांचा तो दरारा आजच्या समाजकारणाला दिशादर्शक ठरला असता, असं वाटत. बाळासाहेबही अत्र्यांना खूप मानतात.
संजयच्या मनात बाळासाहेबांची प्रतिमा उभी राहिली ती अगदी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून. १९६९ साल होत. कर्नाटक सीमप्रश्नाचा लढा चालू होता आणि त्यात शिवसेनेचा सक्रिय सहभाग होता. मुंबईत माहिमला भंडार गल्लीत तेव्हा संजय राहात असत. तोच विभाग शिवसेनेचं मुख्य केंद्र बनला होता. मोरारजी देसाई तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांची गाडी तिथे अडवली गेली. आंदोलनाचं स्वरुप चिघळलं आणि ६९ शिवसैनिक, मराठी मुलं मारली गेली. हे सगळं संजयच्या डोळ्यासमोर घडलं. एवढ्या मुलांना राज्यासाठी मरावंसं वाटलं. हे मुलांचं बलिदान, बाळासाहेबांचं जनतेला केलेलं आवाहन, शिवसेनेला अधिक दृढ करणं, मराठी माणसाची अस्मिता या सगळ्या गोष्‍टींचा कळत-नकळत परिणाम त्यांच्या मनावर होतच होता. त्यामुळे मराठी माणसासाठी किंवा कामगारांसाठी बाळासाहेबच काही करु शकतील असा विश्‍वासही त्यांना वाटत होता. त्यांच्या माहीमच्या घरी तेव्हा एक कॅलेंडर होतं. प्रचंड गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर बाळासाहेबांचा तरुणपणाचा फोटो होता. तो फोटो आजही संजयनी जपून ठेवलाय.
शिवसेना आणि बाळासाहेब यांचं आकर्षण तेव्हापासून सुरु झालं. अगदी शाळेत असल्यापासून सेनाभवनात जाऊन थांबायचं. तिथलं काम जवळून अनुभवायचं. कधी कधी तर नुसतंच तिथे सेना भवनाच्या खाली जाऊन उभं रहायचं, असंही चाले. मग हळूहूळू बाळासाहेबांशी पहिली भेट झाली. ‘मार्मिक’ मधलं लिखाण त्यांच्या नजरेला पडलं आणि त्यांचा स्नेहबंध जुळला तो कायमचा. शिवसेनेच्या सगळ्या महत्त्वाच्या घाडामोडीत संजयनी त्यांच्याबरोबर दौरेही केले. अनेकदा चर्चाही झाल्या. ‘सामना’ हा त्यांचा प्राण होता. त्यामुळे त्या पातळीवर वर्तमानपत्र म्हणून तिथे अनेक बदल व्हावे यासाठी ते प्रयत्‍नशील असतानाच ‘सामना’ च्या कार्यकारी संपादकपदी त्यांनी संजय राऊत यांची नेमणूक केली. त्यापूर्वी कधीही अग्रलेख लिहिला नव्हता. पण बाळासाहेबांनी त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास टाकला आणि संजयनीही तो विश्‍वास सार्थ करुन दाखवला. सामानाचं स्वरुप थोडं थोडं बदलत गेलं. तो मुख्य धारेतला पेपर बनला. केवळ शिवसेनामय असलेलं हे वृत्तपत्र आता माराठी माणसाला आपला आधार वाटू लागलं. वृत्तपत्राची भाषा बदलली. म्हणजे अग्रलेखातून बाळासाहेबांचेच विचार प्रगट होत राहिले. पण अधिक संवादी भाषेमुळे ते अधिक संवादी भाषेमुळे ते अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू लागले.
जेव्हा १९९५ साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवाजी पार्कातल्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी ‘सामना’चं आणि संजय राऊत यांचं असलेलं योगदान याविषयी जाहीर उल्लेख केला. पण असं असलं तरी शिवसेनेतल्या नेत्यांची काही मतं जेव्हा खटकली किंवा पक्षाच्या धोरणाविरुद्ध काही मुद्दे मांडले होते, त्यांचं आता काय झालं? असा जाबही संजयनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून विचारलेला आहे. याबाबतीत ते म्हणतात, "प्रत्येक गोष्‍टीचा जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि लोकांचा जर त्यात हित असेल तर आम्ही त्याचा वापर जरुर करू. हा संघर्ष केल्याशिवाय प्रश्न सुट्त नसतात."
मुळात संजयनाही या संपादकपदापर्यंत येण्यापूर्वी खूपच संघर्ष करावा लागला. या संघर्षाची खरी सुरुवात झाली ती १९८२-८३ च्या काळात. तेव्हा त्यांचा एक्‍सप्रेस वृत्तपत्र समूहात शिरकाव झाला. पण हा चंचुप्रवेश पत्रकार म्हणून न होता कारकून म्हणून झाला आणि तोही जाहिरात खात्यात. तिथे राहून त्यांनी त्या खात्याचा सगळा कारभार शिकून घेतला, पण त्यांचा खरा ओढा होता तो संपादकीय विभागाकडे. त्यामुळे संपादकीय विभागातला माणूस जाहिरात विभागात जाण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. त्या वेळी विद्याधर गोखले ‘लोकसत्ता’च्या संपादकपदी होते. त्यांनीही खूप प्रयत्‍न केले. कारण त्यांनाही माहीत होतं की, संपादकीय विभागातला माणूस जाहिरात विभागात पडल्याने तिथे त्याला काहीच स्‍कोप नव्हता. पण हळूहळू संजयनी आपली उपयुक्‍तता लोकंच्या नजरेला आणून दिली. अनेक वादग्रस्त विषयांवर अधूनमधून ते लिहू लागले. विद्दाधर गोखले त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होतेच. तेव्हा ते म्हणाले होते की, अशीच चिकाटी ठेव, तुझे हात स्वर्गाला लागतील.
या काळात अनेक अडचणी आल्या. पण सविताताई म्हणाल्या, "त्याने या गोष्‍टी घरात कधीच आणल्या नाहीत. त्या दिवसांत त्याच्या मनासारख्या गोष्‍टी होतच नव्हत्या. पण तरीही तो शांत होता. त्याचा हा शांतपणा त्याल अनेक ठिकाणी आजही उपयोगी ठरतो. पुढे तो ४ वर्षांनी ‘लोकसत्ता’च्या संपादकीय खात्यात दाखल झाला. तेव्हा मॅनेजमेंटही बदलली होती. विवेक गोएंकांची याबाबतीत खूप मदत झाली आणि त्याच्या मनासारखं काम त्याला मिळालं. पण या सगळ्या संघर्षात ४ वर्षं गेली."
सवितातईंच्या बोलण्यालाच जोड देत संजय म्हणाले, "माझ्यावर थोडासा अन्यास झाला, पण त्याने माझं फारसं नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. पत्रकारितेची चार वर्षं फुकट गेली हे खरं, पण त्याचबरोबर वृत्तपत्राशीच निगडित असलेल्या जाहिरात विभागाशी माझा जवळून संबंध आला आणि त्यामुळे त्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्‍टी मला समजल्या, ज्याचा मला आज संपादकपदी आल्यावर फायदाच होतो आहे."

माणसाचा अनुभव कधीही फुकट जात नाही. तो अनुभवच त्याला खूप काही शिकवून जातो असं म्हणतात, ते खरं आहे. किंबहुना या संघर्षामुळे पुढची वाटचाल, ते अधिक ठामपणे करु शकले.

पुढे तीन वर्षं ते ‘लोकप्रभा’त होते. तिथे असताना असे अनेक विषय त्यांनी हाताळले ज्यांचं लोकांना फार आकर्षण असतं आणि अनेक लेखकांनी ज्या विषयाला स्पर्शही केला नव्हता, असे विषय अतिशय खुमासदार शैलीत त्यांनी वाचकांसमोर मांडले. ‘गँगवार’ हा विषय लोकांपर्यंत आणून ठेवण्याचं प्रथम श्रेय जातं ते संजय राऊत यांच्याकडे. माफियांच्या विषयासाठी तर ते बिहारपर्यंतही जाऊन आलेले आहेत. प्रत्यक्ष जाऊन, इत्‍थंभूत माहिती रोचक शब्दात आणि धारदार लेखणीने लिहण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते खूपच गाजले आणि त्या तीन वर्षांत त्यांना खूप नाव मिळालं. त्यांची कव्हरस्टोरी असली की ती वाचकांच्या पसंतीला उतरतील समजा. या कव्हरस्टोचंही त्यांनी रुप पालटलं. त्याला एखाद्या स्‍क्रिनप्लेचं स्वरुप दिलं. म्हणजे मग नुसती माहिती न राहता, काहीतरी नाट्य घडतंय असं तो लेख वाचताना वाटत असे. शिवाय या सगळ्या गोष्‍टीला ठामपणा होताच. धारदार लेखणी होतीच.

संजय म्हणतात, "अहो लढण्यासाठी अशीच धारदार लेखणी हवी. जर आंदोलन निर्माण करायचं असेल, चळवळ उभी कराय्ची असेल तर अशा धारदार शब्दांचीच गरज असते. पण प्रसंगी माझी लेखणी तितकीच भावूकही होते. जसा विषय असेल त्याप्रमाणे मी मांडत असतो."
संजयचे भाऊ सुनील म्हणाले, "या ‘लोकप्रभा’च्या काळात लोक भेटले ज्यांच्या बंधूच्या (संजय) लेखांचं कौतुक होतं. एक माणूस त्याच्या लेखांची सगळी कात्रणं घेऊन भेटायला आला होता आणि बंधूची भेट करून द्या म्हणून अगदी आग्रह करत होता. आम्हालाही इतकं आश्चर्य वाटलं. बंधूचे सगळे लेख त्याने जपून ठेवले होते."
मुळातच जपून ठेवण्यासारखी माणंसही त्यांनी खूप जोडली. विशेषत: श्रीकांत ठाकरेंचं आणि त्यांचं नातंच वेगळं होतं. रोज सकाळी त्यांना भेटून मग सामनात यायचं हा संजयचा नित्यक्रम होता... अनेक वर्षं... श्रीकांतजींनाही त्याशिवाय करमत नसे. हे ऋणानुबंध ‘मार्मिक’चं सगळं काम श्रीकांत ठाकरेच पाहात होते. अशीच एक जोडलेली महत्त्वाची व्यक्‍ती बाळासाहेब ठाकरे. त्यांचे आशीर्वाद तर आहेतच संजयच्या पाठीशी. ‘सामना’च्या माध्यमातून त्यांचेच विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम संजय गेली १३ वर्षं करतायत. १ मे १९९१ य दिवशी ‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी घेतली आणि एखादी जबाबदारी अंगावर घेतली की झोकून देणं आलंच. अगदी घराच्या आघाडीवरही त्यांचा हाच शिरस्ता आहे. विशेषत: वडील गेल्यावर तर घराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी व्यवस्‍थित सांभाळली. आईची जास्तीत जास्त काळजी घेणं. तिची औषधं, तिला डॉक्‍टरांकडे नेणं या सगळ्या बारीकसारीक गोष्‍टी आजही ते सांभाळतात. ते म्हणतात, "आज दादर, पार्ल्यालाही राहू शकलो असतो पण जिथे मी लहानाचा मोठा झालो, वडिलांची जिथे घर घेतलं होतं, तिथेच राहणं आणि तेही सगळ्यांनी एकत्र राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आई आमची कॅप्‍टन असते आणि आम्ही सगळी मुलं, तिची नातवंड सगळे तिच्या अवतीभोवती असतो. आमच्या बाबांना याचं फार कौतुक होतं. आमच्या दोघांच्या सगळ्याच विषयावर खूप चर्चा व्हायच्या. किंबहुना त्यांचाही कामगार चळवळीत प्रत्यक्ष सहभाग होता. म्हणूनच माझीही ती सुरुवात झाली आणि लहानपणीही अनेकदा मस्ती केल्यावर बाबांनीच वाचवलेलं आहे. पण त्यांचंही बोलणं असंच रोखठोक होतं. पटलं नाही तर समोर सांगायचे. कमी बोलायचे, पण प्रेमळ होते. माझ्या लिखाणाचं त्यांनाही खूप कौतुक होतं.

आज घरातल्या प्रत्येकालाच त्यांच्या कर्तृत्‍वाविषयी कौतुक आहे. व्यवसायाने शिक्षिका असणा-या संजयच्या पत्‍नी वर्षा म्हणतात, "त्यांना इतरांच्या दु:खाबद्दल फार वाईट वाटतं. सगळ्यांचं दु:ख दूर व्हावं असचं वाटत असतं. ते मुलींना नेहमी सांगतात, इतरांच्या मानाने तुम्हाला खूप मिळतंय. आपण खूप सुखी आहोत. तसे ते सगळ्यांमध्ये चटक्न मिसळतील असं नाही, पण घरातल्या माणसांबरोबर राहायला त्यांना आवडतं. सगळे एकत्र राहात असल्यामुळे आमची मोठी मुलगी उर्वशी कशी मोठी झाली ते कळलंही नाही. धाकटी विधाताही तशीच, पण ती मात्र थेट तिच्या बाबांसारखी आहे अगदी रोखठोक."

संजय राऊत यांच्या दोन्ही मुली मराठी माध्यमाच्या शाळेत जातात. ‘विद्यार्थ्यांनी शिकावं नाहीतर संस्कारांचं शेपूट कापलं जातं’, असं त्यांना वाटतं. शिवाय ते म्हणतात, "ज्या मराठी भाषेने मला हे वैभव दिलं तिच्याशी प्रतारणा कशी करायची? मी जर मराठीतून शिकलो नसतो तर आचार्य अत्रे, छ्त्रपती शिवाजी, यशवंतराव चव्हाण, कॉ. डांगे ही माणसं मला कळलीच नसती. त्यामुळेच मी माझ्या मुलींना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं."
  विषय कोणताही असो, नेटाने तो सर्वांपर्यंत नेणं हा त्यांचा खाक्या. मग एका मुलीला वाचवताना मेलेला महेश कर्वे असेल किंवा नोकरीसाठी ११ वर्षं संघर्ष करणारे श्याम केंद्र असतील, पेन्‍शनसठी १४ वर्षं लढणारे पंढरीनाथ असतो किंवा एका अंध विद्यार्थ्याल बी.एड्‌. करायचंय म्हणून त्यांनी लिहिलेला लेख असो. या आणि अशा अनेक प्रकरणांत संजय राऊत यांच्या लेखणीने संबंधित व्यक्‍तींना न्याय मिळवून दिला आहे. हीच तर त्यांच्या लेखणीची ताकद आहे. आतातर हीच लेखणी ‘खासदार’ या नात्यानेही चालेल. पत्रकराच्या लेखणीला आता अधिकाराची जोड मिळाली. या अधिकाराला समाजाच्या सर्व थरांतून पाठिंबाही मिळाला. आणि याचाच सविताताईंना खूप अभिमान आहे. अन्यायाविरुद्ध ही लेखणी अशीच ‘रोखठोक’पणे ‘सच्चाई’ने उचलली जावो.

No comments:

Post a Comment