Sunday 10 February 2013

सुकन्या

जेव्हा म्हातारा ठाकूर हरीसिंग आजारी पडला, तेव्हा आपले आयुष्य सरत आले आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने सर्व नातेवाईकांना व कुटुंबियांना जवळ बोलावले. त्याची एकुलती एक सुंदर मुलगी लालडी ही पित्याजवळच बसून त्याच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत होती.
त्याच्या नातलगांनी विचारलं, ‘‘ठाकुरजी, तुमची काही इच्छा असल्यास आम्हाला सांगावी, म्हणजे आम्ही ती पूर्ण करु.’’ ठाकूरजीने हळू आवाजात उत्तर दिले, ‘‘मी करता येईल तेवढं केलं आहेच, पण माझ्या दोन इच्छा पुर्‍या व्हाव्यात असं मला वाटतं.’’ 
‘‘कोणत्या इच्छा, बाबा?’’ लालडीने विचारलं. 

‘‘मुली, माझ्या या कोठीत ‘तोडरमल’ गीत गायलं जावं असं मला वाटतं!’’ 

जेव्हा नूतन वधुवर विवाहानंतर घरी येतात त्यावेळेला नव्या सुनेच्या गृहप्रवेशाच्यावेळी ‘तोडरमल’ गीतगायन होतं. आता हरीसिंगाला तर मुलगा नव्हता. तेव्हा त्याच्या वाड्यात हे गीत गायन कसं शक्य होतं? थोडा वेळ सगळेजण निमूटपणे बसले. शेवटी एकाने मान डोलावली, ‘‘हो, तुम्ही मुलगा दत्तक घेतलात तर जमेल हे.’’

हरीसिंगाने सुस्कारा सोडून नकारार्थी मान हालवली. ‘‘त्याला आता उशीर झालाय. माझी दुसरी इच्छा आहे की गुजरातचे काही उमदे घोडे माझ्या कुटुंबासाठी आणले जावेत.’’ सगळेजण चक्रावले. ‘हे तर शक्यच नाही!’’ लोक आपसात कुजबुजले.

‘‘जर आपल्याला एखादा शूर पुत्र असता तर हे सारे सहज शक्य झाले असते!’’ एकजण दुःखी स्वरांत म्हणाला. जवळची गर्दी पांगली. एकटी लालडीच पित्याजवळ उभी होती. ‘‘बाबा, मी तुमच्या दोन्ही इच्छा पुर्‍या करीत.’’ तिने वडिलांचा हात हातांत घेऊन सांगितले. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

वडिलांनी तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत निश्चयाची चमक त्यांना दिसली. ‘‘पोरी, देव तुझे रक्षण करो!’’ असं म्हणून थोड्याच वेळानंतर त्यांनी प्राण सोडला. पित्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी लालडीने योजना आखली. पुरुषवेष धारण करुन तिने आपले लांब केस फेट्याने झाकले. एक चांगली तलवार हातात घेऊन ती घोड्यावर स्वार झाली व गुजरातच्या दिशेने निघाली.
 
 


वाटेत तिला त्याच कामासाठी निघालेले दोघेजण भेटले. एक तरुण होता राजपूत योद्धा, आणि दुसरा होता एक न्हावी. तिघांची मैत्री झाली आणि ते एकत्र वाटचाल करु लागले. ज्या शहरांत उत्तम घोड्यांची पैदास व विक्री होत असे, तिथे ते पोचले. गुजरातच्या राजाचे उत्तम घोडे कधी पागेत बांधलेले नसत. त्यांना चरण्यासाठी खास कुरणे राखून ठेवलेली होती. तिथे सैनिकांचा नेहमी पहारा असे. ज्या कुणाला घोडे हवे असतील त्यांनी त्या सैनिकांचा पराभव करुनच ते घोडे घेऊन जावेत अशी राजाची जाहीर घोषणा होती.

एका मोठ्या शेतांत एका टोकाला एक ढोल ठेवलेला होता. ज्या कुणाला घोडे न्यायचे असतील, त्यांनी तो ढोल वाजवायचा, त्याचा आवाज ऐकून सैनिक पुढे येत. जर आव्हान देणारा हरला, तर त्याला रिकाम्या हाताने घरी परत जायची पाळी येई. परंतु जर तो जिंकला तर त्याला आवडतील तितके घोडे न्यायची त्याला मुभा होती. राजाचे सैनिक इतके बलदंड होते की अद्याप कुणीही त्यांना हरवून घोडा नेऊ शकला नव्हता.

साहजिकच हरीसिंग ठाकुराच्या नातेवाईकांनी गुजरातचे घोडे आणण्याचा प्रयत्न करणे टाळले होते. जेव्हां लालडी व ते दोघेजण त्या शेतात पोचले, तेव्हा लालडीने ढोल वाजवायचे ठरवले. ‘तू शेतांतले चांगले घोडे पारखून घेशील कां? तोपर्यंत मी त्या सैनिकांशी लढेन.’’ तिने त्या राजपूत लढवय्याला विचारले. त्याने होकार दिला.
 
ते दोघेजण घोडे बघत होते तोवर लालडीने ढोल वाजवला. सैनिकांचा एक जथा पुढे आला. ‘‘इथून पळा तुम्ही! आम्ही एकाच माणसाच्या सैन्याशी लढत नसतो. घोडे नेण्यासाठी इथे फक्त मोठे सशस्त्र सैनिकांचे गट येतात.’’ त्यांच्या नेत्याने तिला खिजवले. पण ती बधली नाही. ‘‘असू द्या हो! मी एकटाच तुम्हा सगळ्यांशी लढणार आहे.’’ आपली तलवार परजत तिने त्याला आव्हान दिले. 

‘अरे, अरे, अरे! तू कसा दिसतो आहेस, कसा बोलतो आहेस! अजून तुला मिसरुडदेखील फुटली नाही रे!’’ तो नेता हसतच म्हणाला. लालडीने तडफदारपणे उत्तर दिले, ‘‘तुम्हाला माझ्या लढण्याबद्दल शंका असेल तर मी ही तलवार जमिनीत खुपसतो. जर तुमच्यापैकी कुणीही ती वर उचलून दाखवली तरी मी तो पराभव मानून घरी परत जाईन.’’ या पोरसवदा मुलाची ही विक्षिप्त घोषणा ऐकून त्या सैनिकांना गंमत वाटली. 


लालडीने आपली तलवार जमिनीत खुपसली. एक सैनिक पुढे आला आणि त्याने ती तलवार उचलायचा प्रयत्न केला. छे! ती आत अडकूनच बसली होती. कितीही प्रयत्न केला तरी त्याला काही ती काढता येईना. तो मागे वळला आणि दुसरा सैनिक आला, त्यानंतर एकापाठोपाठ एक असे सगळे सैनिक येऊन गेले, पण कुणालाच ती तलवार उपसून काढता येईना. शेवटी त्यांच्या नायकानेदेखील प्रयत्न करुन पाहिला व तो परत गेला. ते सर्वजण निमूटपणे शेतातून बाहेर पडले.

लालडीने तिची तलवार जमिनीतून काढली. ती जेव्हा जमिनीकडे वाकली, तेव्हा तिचा फेटा अचानक सरकला आणि तिचे लांबसडक केस मोकळे सुटले. तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. तिचा सहकारी न्हावी जवळच होता. ‘‘तू मुलगी आहेस होय?’’ तो आश्चर्याने उद्गारला. ती ही स्तंभित होऊन त्याच्याकडे बघत राहिली. 


त्यांचा दुसरा सहकारी शेतांतल्या घोड्यांची तिघाजणांत वाटणी करण्यात गुंतला होता. यांचा आवाज ऐकून त्याने वळून पाहिलं. जेव्हा त्यांचा साथी एक मुलगी आहे असं त्याला कळलं, तेव्हां तिने वेषांतर कशासाठी केलंय हे जाणण्याची त्याला उत्सुकता होती. लालडीने त्याला सारी खरी कथा सांगितली. तिचे धाडस पाहून तो शूरवीर प्रभावित झाला. ‘‘तू फारच शूर आणि उत्साही दिसतेयस्. फक्त पुरुषच घोड्यावर बसतात. लढाईवर जातात, आणि साहसी असतात, असं कोण म्हणतं? कुठल्याही पुरुषाला जमणार नाही असला धाडसी प्रयोग तू करते आहेस.’’

‘‘पण माझं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. माझ्या वाड्यांत तोडरमल गीत गायलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी हे वेषांतर आवश्यक आहे.’’ तिने हळूंच सांगितले. परंतु त्या लढवय्याला तिचे बोलणे ऐकू आले नसावे. ‘‘मी अशाच शूर मुलीच्या शोधांत होतो. तू माझ्याशी लग्न करशील?’’ लालडीने झटकन निर्णय घेतला.

तिच्या वडिलांची दुसरी इच्छा पुरी करण्याची ही संधी आयतीच मिळाली होती. तिने उत्तर दिले, ‘‘मी तयार आहे तुमच्याशी विवाह करायला, पण एका अटीवर! या विवाहात मी नवरदेव असेन. मी तुमच्या घरी वरात घेऊन येईन, आणि वधूवेषांत असलेल्या तुम्हाला माझ्या घरी घेऊन येईन.’’ तो तरुण हतबुद्ध झाला. स्त्रीवेश घ्यायचा आणि तोदेखील स्वतःच्याच लग्नात? जवळच न्हावी मित्र उभा होता. 

त्याने सगळा संवाद ऐकला होताच.

त्याने ही अट मान्य करण्याचा सल्ला त्या लढवय्या मित्राला दिला. ‘‘मूर्खपणा करु नकोस’ तो म्हणाला. ‘‘थोडा वेळ तर वधूवेशांत राहायचंय. इतकी चांगली मुलगी मिळणंही दुर्मिळ असतं. हो म्हण!’’ बराच वेळ विचार करुन त्या तरुणाने ही जगावेगळी अट मान्य केली. न्हाव्याने आनंदाने लग्नाची सारी तयारी केली. विवाहाच्या दिवशी लालडी नवरदेवाच्या वेशांत होती आणि तिने ‘वधू’ च्या घरी वाजतगाजत जाऊन विवाह केला. 

विवाहानंतर लालडी आपल्या ‘वधू’ला घेऊन आपल्या गांवी परतली. तिच्या वाड्याच्या उंबरठ्याजवळ घरांतल्या व जवळपासच्या स्त्रिया जमलेल्या होत्या. त्यांनी मोठ्या उत्साहाने नवीन वधुवरांचे स्वागत केले व तोडरमल गीते गायली! लालडीने आपल्या पित्याच्या दोन्ही अंतिम इच्छा पूर्ण केल्या होत्या. म्हणून आजदेखील राजपूत म्हणतातच, ‘‘गुणहीन पुत्र असण्यापेक्षा गुणवती सुकन्या असलेली केव्हांही उत्तम!’’

No comments:

Post a Comment