Thursday 7 February 2013

विद्यावान


निश्चयी विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ आला. त्याने प्रेत खाली उतरवून आपल्या खांद्यावर घेतले. आणि निमूटपणें तो स्मशानाच्या दिशेने चालूं लागला, तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ म्हणाला, ‘‘राजन्, तुझ्या धैर्याची कमाल आहे. मला कौतुक वाटतं, पण तू हे सारं कशासाठी करतो आहेस? मध्यरात्रीं या भयंकर अरण्यांत तू हे साहस कां करतो आहेस? तुला सावध करण्यासाठी मी आत्तापर्यंत अनेक घटना, कहाण्या तुला सांगितल्या, पण तुझा हट्ट कायमच आहे.
आज मी तुला गोविंदची कहाणी सांगतो. त्याच्यांत कर्तव्यतत्परता मुळींच नव्हती. गुरुजींची सेवासुश्रूषा करुन विद्या शिकावी तर त्याला सहनशक्ती नव्हती. मात्र तो जन्मतःच बुद्धिवान, मेधावी होता ! पण कांही समस्या निर्माण झाली तरी तो घाबरुन जाई, त्याचे हातून समस्येचे निराकरण नीट होत नसे. तुझ्या हातूनदेखील अशीच चूक होईल कीं काय ही मला भीती वाटते. या गोष्टींतून तू बोध घे व स्वतःमधे सुधारणा कर. म्हणून ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक’’ आणि वेताळाने पुढील गोष्ट सांगितली.
गंगेच्या कांठी कपिलपुरांत गोविंद नांवाचा एक तरुण मुलगा राहात होता. तो मोठा तरतरीत व प्रफुल्लित असे. सर्व लोकांना वाटायचं कीं कोणतीही विद्या हा चटकन आत्मसात करील. जोरांत न पळतादेखील तो कित्येक कोस चालत जाऊं शकत असे, त्याचा नेम अचूक होता, बाण मारण्यांत तो कुशल होता. नदीला पूर आला असला तरी तो धिटाईने पैलतीरीं जायचे धाडस करीत असे. हे सारं करीत असताना तो शेतांत वडिलांना व घरकामांत आईलाही भरपूर मदत करीत असे. ‘‘हा मुलगा फारच चलाख आहे. त्याला राजवरच्या राजशेखरकडे पाठवलं तर त्याची बुद्धि आणखीनच चतुरस्त्र होईल.’’ गोविंदच्या वडिलांना गांवांतल्या कांही मान्यवर मंडळींनी सांगितलं.
‘‘ते कलाविद्यांत पारंगत आहेत, एक महान पंडित आहेत. त्यांच्या विद्यार्थी शिकून तयार झाला कीं राजा बनण्याच्या योग्यतेचा होतो.’’ वडिलांनी उत्तर दिलं. ‘‘जर ते इतके ज्ञानी व कलानिपुण आहेत तर ते स्वतःच राजा कां बनत नाहीत?’’ गोविंदने बेतालपणें प्रश्न केला. ‘‘असं बोलूं नकोस. राजशेखरांना हवं असतं तर ते केव्हांच राज्य कारभार हाती घेऊं शकले असते. त्यांचं म्हणणं असं कीं विद्यादान हा त्यांचा धर्म आहे आणि ते तो निष्ठापूर्वक पाळतात. त्याचबरोबर नित्यनव्या गोष्टी शिकायला ते सदैव तयार असतात. त्यांच्या तोडीचा माणूस दुसरा झाला नाही असं लोकांचं म्हणणं आहे. कांही काळ तू त्यांचा शिष्य होऊन त्यांच्याकडून शिक्षण घ्यावंस असं माझं मत आहे.’’ गोविंदच्या पित्याने त्याला समजावीत म्हटले.
पण गोविंदला ते पटले नाही. तो म्हणाला, ‘‘कांही विद्यांचे शिक्षण घेणे हे आयुष्याचे ध्येय असते. आरामांत जीवन कंठायला पैसा जवळ हवा! जमेल तितकी इतरांना मदत करायला हवी. जन्मभर शिकत बसण्याची मला कांही हौस नाही.’’ ‘‘ज्याला शिकण्याची शक्ती व सामर्थ्य आहे तो जन्मभर शिकत राहिला तरी त्यांत कांही चूक नाही. ती शक्ती व सामर्थ्य तुझ्यांत आहे कीं नाही ते तूच ठरव आणि निर्णय घे.’’ एवढं बोलून गोविंदचा पिता गप्प बसला. गोविंदच्या उत्साहाला भरते आले व स्वतःबद्दलचा त्याचा अहंकार जागृत झाला.
राजशेखरपेक्षां तो कोणत्याही विद्येंत कमी नाही असा त्याचा ठाम समज होता. तर मग आपण राजशेखरचा शिष्य कशासाठी व्हायचं? गोविंदला वाटलं कीं राजशेखरला न येणारी एखादी विद्या जर आपण शिकली तरच आपले श्रेष्ठत्व नागरिक मान्य करतील. म्हणून तो नव्या कलाविद्यांचा शोध घेऊं लागला. आसपास सावध नजरेने निरीक्षण करुं लागला. त्यावेळीं एक विचित्र घटना घडली.
गोविंदच्या गांवालगत एक मोठी आमराई होती. त्या बागेच्या मध्यावर आंब्याच्या झाडासारखे दिसणारे एक झाड होते. पण त्याची फळें दिसायला बोरासारखी आणि चवीला कारल्यासारखी कडूजहर होती. ते झाड कित्येक वर्षें तिथें होते.
एके दिवशी गोविंदने एक माकड आमराईंत शिरताना पाहिलं. गोविंदने त्याचा पाठलाग केला. त्या मधल्या झाडाजवळ माकड येऊन धांपा टाकीत तिथेंच थांबलं. त्याने त्या झाडाचं एक फळ खाल्लं. झालं, त्याचा उत्साह दुणावला, आणि भराभर झाडांवर उड्या मारीत ते नजरेआड झालं. तोपर्यंत बागेचा रक्षकही तिथें आला होता. हे दृश्य पाहून त्याला तर वाटलं कीं हे साधंसुधं माकड नसून प्रत्यक्ष हनुमानच आहे. त्याने डोळे मिटून भक्तीभावाने वंदन केले.
पण गोविंदाने मात्र तसं केलं नाही. त्याने हे तर्काच्या कसोटीवर पारखून घेतलं. त्या झाडांत नक्कीच कांहीतरी वेगळी शक्ती आहे. कडू होतं तरीदेखील त्याने ते फळ खाल्लं. त्याच्या शरीरांत कांहीतरी वेगळी शक्ती त्याला जाणवूं लागली. परंतु प्रयत्न करुनदेखील त्याला उंचावर उडता येईना. तरीही तो निराश झाला नाही. त्याचा आपला प्रयत्न त्याने तसाच चालूं ठेवला. तो दमला नि धांपा टाकूं लागला.
एकाएकीं गोविंदला आठवलं कीं माकड दमून जेव्हां धांपा टाकीत होतं, तेव्हांच त्याने एक फळ खाल्लं, आणि एकदम उड्या मारीत ते नाहीसं झालं. गोविंदने लगेच आणखी एक फळ तोडलं नि खाल्लं. दुसर्‍याच क्षणीं त्याला आपले शरीर हलके होते आहे असं लक्षांत आलं. त्याने उडण्याचा प्रयत्न केला आणि कांही प्रमाणांत तो सफलदेखील झाला. आजपर्यंत तो इतक्या उंचावर कधीं उडला नव्हता किंवा कधीं इतक्या लांबवर उडीही त्याने मारलेली नव्हती.
गोविंदला अत्यानंद झाला. माकडापेक्षां जास्त लांब उडी आता माणूस शिकला होता. त्याला वाटलं कीं रामायणकाळांत हनुमानाने असलेच फळ खाल्ले असेल आणि समुद्र पार केला असेल. आपल्या या नव्या विद्येचं प्रदर्शन गोविंद गांवामधे करुं लागला. मात्र आमराईतल्या त्या झाडाबद्दलचं रहस्य मात्र त्याने कुणालाही सांगितलं नाही. त्याला उडताना व लांब उडी मारताना पाहून लोक आनंदाने टाळ्या वाजवीत असत. गांवांत त्याची भरपूर प्रसिद्धी झाली आणि हे अद्भुत प्रदर्शन पाहायला बाहेरगांवांतूनदेखील लोक येऊं लागले.
एकदा गोविंद आपल्या वडिलांना म्हणाला, ‘‘मी इतक्या कमी वेळांत ही नवी विद्या शिकली आहे. राजशेखरला बहुतेक ही विद्या माहीत नसावी! म्हणून आता याच्यापुढें त्यांचा शिष्य मी बनावे हा आग्रह तुम्ही धरुं नका.’’ या नव्या कलेचा गोविंदला फार आनंद झाला होता. पण त्यापेक्षांही राजशेखरला माहीत नसलेली ही कला आपल्याला येते आहे याचाच गर्व अधिक होता. एक दिवस एक वडीलधारे गृहस्थ गोविंदची चौकशी करीत त्या गांवी आले.
गोविंदने स्वतःच आपला परिचय करुन दिला व विचारले, ‘‘आपण कोण ते मला कृपया सांगाल कां?’’ ‘‘माझं नांव राजशेखर. आपण ज्या विद्येचे प्रयोग करता त्याबद्दल मी बरंच ऐकलं आहे. ही विद्या शिकण्यासाठी व आपला शिष्य बनण्यासाठीं मी इथें आलो आहे.’’ गोविंदने चकित होऊन त्यांना विचारले, ‘‘आपण राजशेखर आहात? आपण तर सार्‍या कलाविद्यांमधे पारंगत आहात असं सर्वजण म्हणतात. आपल्याला येत नाही अशी कोणतीही विद्या नाही. आणि ही एक विद्या शिकायला आपण माझ्याकडे आलात? इतक्या विद्यांमधे निपुण असताना ही नवी विद्या शिकण्याची काय गरज आहे?
कीं मला येत नाही अशी कोणतीही विद्या नाही हे जाहीर करायला आणि आपला अहंकार कुरवाळण्यासाठी म्हणून तुम्ही आला आहात?’’ ‘‘बाळ, माझ्यांत अहंकार असता तर मी तुमचा शिष्य होण्यासाठीं कशाला आलो असतो?’’ राजशेखर म्हणाले. पण या उत्तराने गोविंदचे समाधान झाले नाही. तो म्हणाला, ‘‘मग नवी विद्या कशासाठी शिकणार? आपल्यालाही लोकांचे मनोरंजन करुन या विद्येतून पैसे मिळवायचे आहेत कां?’’
‘‘विद्यावानाला पैशाचा मोह नसतो व नसावाही! मी या विद्या स्वतःसाठी शिकलो नाही. आपली ज्ञानसंपदा भावी काळांतल्या पिढ्यांपर्यंत पोंचवावी, या हेतूने मी या विद्यांची, कलांची माहिती देणारा ग्रंथ लिहीतो आहे. आपले ज्ञान आपल्याबरोबर संपू नये, म्हणून मी हे संकलन करतो आहे.’’ राजशेखर म्हणाले. यावर गोविंदने कुत्सितपणें टोमणा मारीत म्हटले, ‘‘हे पहा, माझ्या या विद्येमुळें मानवदेखील माकडासारखा उड्या मारीत दूर जाऊं शकतो. या विद्येचा अंत जरी माझ्याबरोबरच झाला तरी या जगाचे त्यामुळें कोणते असे नुकसान होणार आहे?’’
‘‘आहे तर! मासा पाण्यांत पोहतो. पण जमिनीवर आल्यावर तो तडफडून मरुन जातो. हिमालयांतली अस्वलें, वाळवंटात क्षणभरदेखील राहूं शकणार नाहीत. पण मानवाचं तसं नाही. त्याला पाण्यांत पोहायला शिकलं पाहिजे, हवेंत उडता आलं पाहिजे. वातावरणांतल्या अनेक प्रकारच्या संकटांशी त्याला लढायची वेळ येते, अनेक अडचणींना समोरं जावं लागतं, सोसावं लागतं! म्हणून तर परमेश्वराने मानवाला बुद्धिमत्ता दिली. आता आपल्याच नव्या विद्येबद्दल पहा.
या विद्येच्या मदतीने नदी ओलांडता येईल, आगीच्या ज्वाळांत अडकलं तर आपले संरक्षण करता येईल. प्रत्येक विद्येचं कांहीतरी प्रयोजन असतं. आवश्यकता असेल तिथे तिचा उपयोग मानव करुं शकतो. या विद्या ग्रंथरुपांत जतन करणें, त्यांचा प्रचार करणें हे विद्यावंतांचे कर्तव्य आहे.’’ राजशेखरने गोविंदला सविस्तर सांगून समजावले. राजशेखरचे हे स्पष्टीकरण ऐकल्यावर गोविंदने दोन्ही हात जोडून त्यांना वंदन केले व म्हटले, ‘‘आपण मला क्षमा करा. मी आपल्या बरोबर येईन, आपला शिष्य बनेन व स्वतःचे ज्ञान वाढवीन.
आणि नंतर ही जी विद्या मला येते आहे, ती मी गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला अर्पण करीन. मला आपला शिष्य मानून माझ्यावर कृपा करा.’’ वेताळाने ही गोष्ट सांगितल्यानंतर विक्रमार्काला विचारलं, ‘‘राजन्, गोविंद कोणत्याही गुरुचा आजवर शिष्य नव्हता. गुरुशिवाय त्याने आपली बुद्धि, कौशल्य व चिकाटी यामुळे एक असाधारण विद्या शिकली. त्या विद्येचे महत्व त्याला राजशेखरने समजावून सांगितले, तिची उपयुक्तता त्याला पटवून दिली. तरीदेखील गोविंदने आपले वैशिष्ट्य विसरुन राजशेखरची माफी मागितली व आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारावे यासाठी त्यांची विनवणी केली. हे सगळं अनुचित, असंगत, अनावश्यक व अविचारी वाटतं, नाही कां? त्याने शिकलेल्या नवीन विद्येमुळें गोविंद राजशेखरच्या बरोबरीचा आहे व देशांतल्या विद्यावंतांमधे त्याचंही एक उच्च स्थान आहे, हे तो सिद्ध करुं शकला असता! हातांत आलेली ही सोन्याची संधी त्याने घालवली. माझ्या या शंकांचं उत्तर माहीत असूनही जर तू मौन पत्करलेस तर लक्षांत ठेव, तुझ्या मस्तकाची शकलें होतील.’’
विक्रमार्क म्हणाला, ‘‘गोविंद अहंकारी आहे हे त्याने वडिलांना सुरवातीला जी उत्तरें दिली त्यावरुन स्पष्टच दिसून येतं. त्याच्या वागण्याची पद्धत ही जरा उद्धट आहे; परंतु राजशेखरने त्याच्या प्रश्नांना दिलेली उत्तरें ऐकून त्याच्या लक्षांत आलं कीं तो फक्त त्या एका नव्या कलेंत निपुण आहे. तो हुशार व तरतरीत आहे, व कुशाग्र बुद्धीचा आहे, हे खरं! म्हणूनच त्याच्या लगेच लक्षांत आलं कीं त्याच्यांत अहंकाराचे प्रमाण जरुरीपेक्षां जास्त आहे. त्याला येत असलेली विद्या हीच त्याच्या दृष्टीकोनांतून महत्वाची होती.
राजशेखर त्या श्रेणींतला नव्हते. ते विद्यावान व पंडितांच्यापेक्षांही वरच्या श्रेष्ठ पातळींतले होते. ते ज्ञानी व योगी आहेत. हे ध्यानांत आल्याबरोबर गोविंदने त्यांची क्षमा मागितली. म्हणून हे मुळींच अवास्तव किंवा असंगत नाही.’’ राजाचे मौन भंग करण्यांत सफल झालेला वेताळ शवासहित गायब झाला आणि पुन्हां झाडावर जाऊन बसला.
 

No comments:

Post a Comment