Thursday 7 February 2013

पाताळदुर्ग - 4



(रात्रीच्या वेळी कदम्बच्या राजधानीत एक महाकाय राक्षस आला. राजकुमारी कांतिसेनेला घेऊन तो पळून जाऊ लागला. पहारेकरी त्याच्यावर बाण व भाले फेकू लागले. राजा उग्रसेनाच्या आज्ञेनुसार कांही घोडेस्वार त्याचा पाठलाग करूं लागले. आणि त्याच्यावर अग्निबाण सोडूं लागले. त्यानंतर -)

राजमहालांत माजलेल्या हलकल्लोळामुळे संपूर्ण शहर जागे झाले. लोकांना वाटले कीं, राज्यावर शत्रूने हल्ला केला आहे. कांही प्रजानन नगराच्या प्रवेशद्वाराकडे पळूं लागले. दरम्यान सैनिकांनी सोडलेले बाण अपेक्षित निशाणी न गांठता शहरांतील घरांवरच पडले, आणि बाण पडलेल्या ठिकाणांवर छोट्यामोठ्या आगी लागल्या. लोकांमधे हलकल्लोळ माजला व ते आपल्या घराच्या संरक्षणार्थ पळूं लागले.

राजमहालाच्या गच्चीत उभा असलेला राजा उग्रसेन हे सर्व पहात होता. तो मंत्र्याकडे वळून रागाने म्हणाला, ‘‘महामंत्री, हीच कां आपल्या लोकांची राजभक्ती? असल्या संकटातही प्रत्येकजण स्वतःचा विचार करीत आहे. माझ्या संरक्षणार्थ कोणीही पुढे आले नाही. जर शत्रूने राजावर हल्ला केला तर यांपैकी एकहीजण किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी धांवणार नाही.’’
‘‘महाराज, राज्याचे संरक्षण करण्यासाठी आपले पगारी सैनिक आहेत की! या डरपोक लोकांकडून कशाला अपेक्षा करायची? त्यांना मरूं दे. आणि ही तुमची प्रजा आहे. प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असते. राजाचे व राज्यातील प्रजेचे संरक्षण करणे, ही राज्याच्या सैन्याची जबाबदारी आहे.’’ असे म्हणून मंत्र्याने अग्निबाण सोडणार्‍या सैनिकांकडे राजाचे लक्ष वेधून म्हटले, ‘‘आपले सैनिक राक्षसावर जे बाण व भाले फेकताहेत, त्यामुळे राजकुमारीला इजा पोंचू शकते. त्याविषयी सैनिकांना सावध करणे आवश्यक आहे.’’

उग्रसेन म्हणाला, ‘‘हो...हो...’’ त्याने मान डोलावली व तो गडबडीने गच्चीवरून खाली उतरू लागला. ‘‘महामंत्री, मी परत येईपर्यंत नगराच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. शतभानू कांहीही करू शकतो. आपण त्याच्याकडे पाठविले होते त्या दूतांचे काय झाले?’’
इतक्यांत एका सैनिकाने जिन्याजवळ घोड्याला आणून उभे केले. उग्रसेन ताबडतोब त्याच्यावर स्वार झाला. आणखी कांही घोडेस्वारांसोबत तो नगराचे प्रवेशद्वार ओलांडून जंगलाच्या दिशेने जाऊं लागला. मंत्री कांही वेळ त्याच्याकडे पाहात राहिला. मग किल्ल्याच्या बुरूजाच्या दिशेने जाताना त्याच्या मनांत आले, ‘‘हा उग्रसेन कांही जास्त दिवस राज्य सांभाळू शकणार नाही. कोणत्याही बाबतीत तो नीतीनियमांचा कांही विचार न करताच निर्णय घेऊन टाकतो. त्याचे आत्ता जंगलात जाणे व जंगलात अग्निबाण सोडण्याचा आदेश देणे, हे संकटाला आमंत्रण ठरूं शकते. शेजारचा राजा आधीच आपल्यावर नजर ठेवून आहे. ह्याच्या कुशासनामुळे प्रजेचीही आपल्याला साथ नाही.’’
कदंब नगराच्या पूर्वेच्या जंगलात पहावे तिकडे हातात मशाली घेतलेले सैनिक उभे होते. मशालींच्या उजेडात राक्षस त्यांना सहज पाहूं शकत होता. ते शोधत असलेला राक्षस अशा परिस्थितीत कसा त्यांच्या हाती लागेल? या विचाराने मंत्री आश्‍चर्यचकित झाला होता.
जंगलात असलेल्या धूमक व सोमकच्या मनांतही हाच विचार आला. कदंबनरेशाच्या ह्या मूर्खपणावर दोघांनाही हंसू आवरेना. त्यांच्या दिशेने येणारे सैनिक पाहाताच ते पटकन झाडावर चढले व त्यांनी घोड्यांनाही झाडामागे दडवून ठेवले.
कदंब राज्याचे कांही सैनिक त्याच झाडाखाली येऊन गप्पागोष्टी करू लागले. त्यांच्या बोलण्यांतून धूमक व सोमकला समजले कीं, राजकुमारीचे अपहरण झाले असून उग्रसेन स्वतः जंगलात आला आहे. ‘‘त्या दुष्टाला ठार करण्याची ही चांगली संधी आहे’’ सोमक म्हणाला.

‘‘सोमक, गडबड करू नको. आपण सैनिकांच्या वेषांत असतो, तर ते काम सोपे होते. आत्ता आपण असलेल्या वेषांत कोणी आपल्याला पाहिले तर ते आपल्याच जिवावर बेतूं शकेल. मग तर आपण मारेकरी असल्याचे सिद्ध करणे, त्यांना सहज शक्य होईल. आणि मग आपल्याला निश्‍चितपणे फांशीच दिले जाईल. तेव्हां विचार न करता कृती करणे हे मूर्खपणाचे आहे’’ धूमक म्हणाला. तोपर्यंत झाडाखालचे कदंब राज्याचे सैनिक निघून गेले होते.
‘‘सोमक, उजाडण्यापूर्वी आपण झाडावरून उतरून आपले गांव गाठणे सोयीस्कर ठरेल. जोवर आपण आपल्या कुटुंबियांना राज्याच्या सीमेबाहेर आणत नाही, तोवर आपण कांहीच करू शकत नाही.’’ धूमक म्हणाला. यावर सोमक कांही बोलला नाही. त्याला धूमकचे म्हणणे पटले नव्हते. त्याला वाटत होते कीं, जंगलात एकट्या आलेल्या राजाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी परत मिळणार नाही. सैनिकांना वाटेल कीं, तो राक्षसाकडून मारला गेला, म्हणजे आपल्यावर संकट ओढवण्याचे कांहीच कारण नाही. परंतु राजमहालात जाऊन राजापर्यंत पोचणे त्याला कठीण वाटत होते. तरीही तो गप्प राहिला. मग दोघेही झाडावरून खाली उतरू लागले. इतक्यांत जवळच्याच एका प्रचंड वृक्षामागून एक काळी भयंकर आकृती बाहेर आली व ती जवळच्या गुहांच्या दिशेने जाऊ लागली. त्याच्या खांद्यावर एक बेशुद्ध स्त्री दिसत होती.
धूमकने सोमकच्या खांद्याला धरून मागे खेचले. गुहेकडे जाणारी ती भयंकर आकृती सोमकला दाखवीत तो म्हणाला, ‘‘तो बघ राक्षस. त्याच्या खांद्यावर राजकुमारी आहे. तिच्या अंगावरील हिर्‍यामोत्यांचे दागिने कसे चमकताहेत बघ.’’ ते दृश्य पाहून सोमक चकितच झाला. राक्षस एका गुहेजवळ येताक्षणींच गुहेतून एक गंभीर आवाज आला, ‘‘कोण आहे ते? इथून परत फिर.’’
‘‘अरे वेड्या, इतक्या जोरांत कशाला ओरडतोस? आज रात्री कोणालाही न मारण्याची मी शपथ घेतली आहे. मुकाट्याने गुहेंतून बाहेर पड व इथून निघून जा’’ राक्षस म्हणाला. ‘‘तू राक्षस असावास, असे वाटते. मी आत्ताच एका महान वीरावर उपाय करून त्याला शुद्धीवर आणले आहे. तेव्हां जास्त आवाज करूं नकोस. कांही न बोलता निमूटपणे इथून निघून जा’’ गुहेंतून उत्तर आले.

ते ऐकून राक्षस संतापला. त्याने एक पाय पुढे टाकत गर्जना केली. ‘‘अरे ए माणसा! तू हे काय बोलतोस? मी राक्षस आहे राक्षस! कुम्भीर नांव आहे माझे.’’
‘‘मी मांत्रिक आहे, मांत्रिक कालशंबर!’’ गुहेतून आवाज आला. त्यापाठोपाठच शंबरचा चमचमता मंत्रदंड सापाप्रमाणे फुत्कार टाकत सरसर बाहेर आला व कुम्भीरच्या डोक्यावर जाऊन आदळला.
मंत्रदंडाचा आघात होताच इतका बलवान कुंभीरही खाली पडला. परंतु त्याने राजकुमारी कांतिसेनेला इजा होऊ दिली नाही. ती जणूं झोंपेतून जाग आल्याप्रमाणे जागी झाली. तिने चौफेर नजर टाकली. ती उंच वाढलेल्या गवताच्या गालिच्यावर झोपली होती. तिच्याजवळच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवलेला राक्षस कण्हत होता. दांतओठ खात होता. त्याच्या डोक्यावर असणार्‍या दोन शिंगांपैकी एक शिंग मंत्रदंडाच्या आघाताने तुटून पडले होते. तिथे जखम निर्माण होऊन तिच्यातून खूप रक्तस्त्राव होत होता.  
महाभयंकर राक्षसाला त्या अवस्थेत पाहून कांतिसेनेची भीती कमी झाली व तिला त्याची दया येऊ लागली. ती विचार करूं लागली कीं, आपले संपूर्ण सैन्य असतानाही ह्या एकट्याने मला महालांतून पळवून आणले आणि ह्याची ही अवस्था कशी झाली? ह्याच्यापेक्षांही शूरवीर ह्या जंगलात राहातात कीं काय? तिला खूप आश्‍चर्य वाटले. मग तिला वाटले कीं, कदाचित तिचे वडील व त्यांचे सैनिक तिच्या शोधार्थ जंगलात आले असावेत आणि त्यांनी राक्षसाला घायाळ केले असेल, तिला सोडविण्याच्या प्रयत्नात!- ती उठून म्हणाली, ‘‘अरे राक्षसा, मला खायचेच होते तर इतक्या दूरवर कशाला घेऊन आलास? तुला कोणी घायाळ केले? माझ्या वडिलांनी? ते खूप शूर आहेत परंतु त्यांना शरण येणार्‍यांना ते कांहीही करीत नाहीत. मी त्यांना मनवून तुझी सुटका करीन. परंतु इथे माझे वडील किंवा त्यांचे सैनिक कोणीच दिसत नाही.’’ आणि तिने आजूबाजूला पाहिले
राजकुमारीचे बोलणे ऐकून, वेदना होत असूनही राक्षसाला हंसू आवरले नाही. त्याला तिच्या बोलण्याची ढबही आवडली. कुंभीर तिथून उठला व जवळच्या झाडांकडे गेला. झाडांची पाने तोडून, चुरडून त्याने आपल्या जखमेवर लावली आणि परत तो कांतिसेनेजवळ आला. तेव्हां कांतिसेना गुहेच्या दिशेने पहात होती आणि भीतीने थरथरत होती. ‘‘ह्या गुहेंत कोण बोलत आहे? कोणी महाराक्षस आहे कां? कीं तुझे सेवक आहेत? कोण आहे आंत?’’ कांतिसेनेने विचारले. कुंभीरने रागीट नजरेने गुहेकडे पाहिले व तो म्हणाला, ‘‘आंत माझे सेवक नाहीत, शत्रू आहे. त्या शत्रूनेच माझ्या डोक्यावर ही जखम केली आहे. तो कोणी मांत्रिक आहे. खूप बलशाली दिसतो आहे. त्याच्या नादाला लागलो, तर माझे काम राहून जाईल. म्हणून आत्ता मी त्याला सोडून देतो आहे.’’

‘‘तुझे कोणते काम आहे? चोरासारखे मला माझ्या घरून पळवून आणण्याचे? काय तुझी वीरश्री! थूऽऽऽ’’ कांतिसेना उभी रहात म्हणाली. हे ऐकून कुंभीर स्तंभित झाला. शरमेने त्याची मान खाली गेली. कांतिसेनेसमोर हात जोडून तो म्हणाला, ‘‘कांतिसेना, मी स्वतंत्र नाही आहे. मी एका अतिक्रूर, महाशक्तिमान राक्षसाचा केवळ एक नोकर आहे. त्या महापापीने तुला उचलून आणण्यासाठी मला पाठविले आहे. कोणीही त्याची आज्ञा मोडू शकत नाही. परंतु एक ना एक दिवस, मी तुला तुझ्या घरी सोडेन. मग त्यासाठी मला माझे प्राण गमवावे लागले तरी बेहत्तर! तुझा सरळपणा पाहून मी हा निश्‍चय केला आहे. मी तुला कांही इजा पोचू देणार नाही.’’
‘‘मग हे आत्ताच कां करीत नाहीस?’’ कांतिसेनेने विचारले. तिला राक्षसाविषयी कणव वाटू लागली होती. ‘‘असे केले तर आपण दोघेही संकटात सांपडूं शकतो. मला माझ्या मालकाने तुला जिथे घेऊन येण्यास सांगितले आहे, तिथे तुला घेऊन जावेच लागेल. घाबरूं नको. मी तुला त्याच्या तावडीतून नक्की सोडवेन, आणि या जगांत तुला ज्याच्याशी लग्न करायचे असेल त्याच्याशी तुझे लग्न लावून देईन’’ कुंभीर म्हणाला.
कांतिसेना यावर कांहीच बोलू शकली नाही. कुंभीरच्या भलेपणावर तिचा विश्‍वास बसू लागला होता. परंतु तो काय बोलतो आहे. ते मात्र समजत नव्हते. तिने विचार केला कीं, आता आपल्याला काय करता येईल? पळून जाण्याचा प्रयत्न व्यर्थच ठरेल ना? राक्षसाच्या डोळ्यांत धूळ फेंकणे तर शक्य नाही. मदतीसाठी आरडाओरडा करण्याचाही कांही उपयोग होणार नाही. कुंभीर चिडला तर तिचा जीवही घेऊ शकेल. तेव्हां त्याच्याशी गोडगोड बोलूनच आपले काम साध्य होऊ शकेल.

तिला वाटलं कीं, हा राक्षस एखाद्या भल्या माणसासारखा आहे. त्याला घाबरण्याचे कांहीच कारण नाही. परंतु हा राक्षस मला ज्याच्यासाठी पळवून नेत आहे,तो माझे काय हाल करेल देव जाणे! कांतिसेना असा विचार करीत असतानाच तिला गुहेसमोर मशालीच्या उजेडांत एक विकृत आकृती आल्याचे दिसले. त्याचे केस बरेच वाढलेले होते. त्याने पायघोळ भगवे वस्त्र घातले होते व त्याच्या हातात एक मंत्रदंड होता.

‘‘राक्षसा, अधमा! अजून तू इथेच उभा आहेस? कुणावर हल्ला करीत आहेस कां? आणि तू स्वतःशीच बोलतो आहेस? कीं तुझ्याबरोबर आणखी कोणीही आहे?’’ मांत्रिकाने विचारले. कांतिसेनेला आपल्यामागे लपवीत कुंभीर उभा राहिला. संतापलेल्या लालभडक डोळ्यांनी, दांतओठ खात तो म्हणाला, ‘‘अरे ए, माणूस कुठला! आज कोणालाही न मारण्याची मी शपथ घेतली आहे. तरीही आता मी कांही तुला जिवंत सोडणार नाही.’’ आणि तो पुढे निघाला.
मांत्रिक खिदळत आपला मंत्रदंड उचलून म्हणाला, ‘‘अरे, राक्षसकीटका, तुला इतका राग कसा काय आला?’’ आणि तो मंत्रदंड सोडणार इतक्यांत त्याच्या हातांत एक अग्निबाण घुसला. त्याच क्षणीं झाडीमागून इतका गदारोळ उठला कीं सारे जंगल दुमदुमून गेले. मांत्रिकाने आपल्या हातांतील मशालीचा बाण काढून खाली टाक्ला आणि तो गुहेत निघून गेला. कुंभीरने राजकुमारीला खांद्यावर टाकले व तो आणखी एका गुहेकडे धावला. दरम्यान सगळीकडून बाणांचा वर्षाव सुरू झाला.                            (क्रमशः)





No comments:

Post a Comment