Thursday 7 February 2013

पाताल दुर्ग- 2

(कुंतल देशाच्या मंत्र्याच्या मुलाचे नांव शशिकांत होते. तो दोन मित्रांबरोबर शिकारीला गेला होता. तिथे शत्रूच्या बाणाने त्याला घायाळ केले. भद्र नांवाचा त्याचा मित्र तिथून पळून राजधानीला पोंचण्यांत यशस्वी झाला. जंगलात काय घडले असावे, याविषयी कुंतलनरेश व त्याचा मंत्री बोलत असताना एका सैनिकाने येऊन सांगितले कीं, कदंबनरेशाने दूत पाठवले आहेत. त्यानंतर-)
कदंबनरेशाने पाठविलेले चार दूत दोन कैद्यांना घेऊन दरबारांत आले. शतमानु सिंहासनावर विराजमान झाला होता. मंत्री गंगाधरने कैद्यांच्या दोर्‍या सोडण्याची आज्ञा शिपायांना केली. शिपाई कैद्यांना बांधलेले दोरखंड सोडत असतानाच उग्रसेनाच्या दूतांपैकी एकजण पुढे आला. त्याने मान तुकवून गंगाधरला प्रणाम केला व तो म्हणाला, ‘‘महामंत्री, आम्हाला माफ करा. हे अत्यंत क्रूर व अतीसाहसी आहेत’’ आणि तो एका कैद्याजवळ जाऊन त्याला फटका लगावत म्हणाला, ‘‘हा आहे धूमक, स्वतःच्या पित्याचा मारेकरी आणि हा दुसरा सोमक, स्वतःच्या भावाचा मारेकरी!’’ ‘‘या मारेकर्‍यांना आमच्याकडे पाठविण्यांत आपल्या राजाचा काय उद्देश आहे?’’ मंत्री गंगाधरने त्या तिघांना विचारले. हे ऐकताच तिघे दूत समोर आले. ते एकदम कांहीतरी बोलणार इतक्यांत त्या पहिल्या दूताने कांहीतरी खूण केल्याने ते थांबले. 

पहिल्या दूताने मान वर करून एकदा शतमानूकडे पाहिले. मग राजालाही ऐकूं जाईल, अशा बेताने तो मंत्र्याला म्हणाला, ‘‘महाराज व महामंत्री, दोघांनाही आदरपूर्वक प्रणाम करून आमचे महाराज उग्रसेन एक दुःखद वार्ता कळवू इच्छितात. कांही कारणाने कदंब राज्याच्या हद्दीत प्रवेश केलेल्या महामंत्र्यांच्या सुपुत्रास व त्याच्या साथीदारांना कैदेतून पळालेले महाभयंकर गुन्हेगार धूमक व सोमकनी ठार केले आहे. सिंहांच्या एक कळप त्या दिशेने आला. त्यामुळे तिथून धूम ठोकलेल्या या मारेकर्‍यांना आमच्या सैनिकांनी पकडले. महामंत्र्यांच्या मुलाचे त्याच्या मित्रांचे पार्थिव शोधण्याचे प्रयत्न पर्वतराजींमधे सुरू आहेत. जर ते सांपडले तर ताबडतोब आपणांस कळविण्यांत येईल.’’ ‘‘आपल्या महाराजांनी हे सर्व तोंडीच सांगायला सांगितले आहे, कीं लिखित स्वरूपांतही कांही पाठविले आहे?’’ गंगाधरने विचारले.
‘‘महाराजांनी या भयंकर घटनेविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हातच चालेना. म्हणून त्यांनी मला तोंडीच सांगायला सांगितले आहे’’ दूत म्हणाला. कदंबनरेशाच्या दूताचे बोलणे राजा शतमानू लक्षपूर्वक ऐकत होता. एकाएकी उठून उभा राहात तो म्हणाला, ‘‘ठीक आहे. तुम्ही जाऊं शकता. या मारेकर्‍यांवर खटला चालवून आम्ही त्यांना शिक्षा देऊं.’’
हे ऐकताच उग्रसेनाचे दूत काळजीत पडले व एकमेकांकडे पाहू लागले. हे कैदी इथे राहिले, तर आपले बिंग फुटेल, ही भीती त्यांना वाटूं लागली. कारण कैद्यांनी राजाला खरी गोष्ट सांगितली असती. मग आपल्या महाराजांच्या आज्ञेचे उल्लंघन झाले असते. काय उत्तर द्यावे या विचारांत दूत पडले असताना, एक दूत पुढे येऊन म्हणाला, ‘‘महाराज, क्षमा असावी.  स्वतःच्या वडिलांच्या आणि भावाच्या या मारेकर्‍यांना आधीच आजीवन कारावासाची शिक्षा दिली गेली होती. त्यांनी कैदेतून पळून जाऊन पुन्हां हा गुन्हा केला आहे. म्हणून आमच्या महाराजांनी आज्ञा दिली आहे कीं, या दोन्ही गुन्हेगारांना कदंब व कुंतल देशांच्या सीमारेषेवरील एका महावृक्षाला लटकावून फांशीची शिक्षा देण्यात यावी. परत जाताना आम्ही हे काम अवश्य करू. आता आज्ञा असावी .
मग उग्रसेनाचे चारही दूत त्या दोन कैद्यांजवळ गेले आणि त्यांना फटकारे मारीत परत घेऊन निघाले. कैद्यांपैकी धूमक संतापाने लालबुंद झालेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पहात म्हणाला, ‘‘शीः, दुष्ट!’’ पण, फटकारे बसूनही सोमकने मात्र हूं की चूं केले नाही, कीं त्याच्या चेहर्‍यावर वेदनेची किंचितशीही छटा दिसली नाही. दूतांपैकी एकजण त्यांच्याजवळ येऊन दांत विचकत म्हणाला, ‘‘याद राखा! स्वतःच्या बायकामुलांना विसरू नका!’’
कैद्यांना घेऊन सर्व दूत दरबारातून बाहेर पडले. ते गेलेल्या दिशेला राजा शतमानू एकटक पहात होता. तो म्हणाला, ‘‘महामंत्री, उग्रसेनच मारेकरी आहे, हा माझा अंदाज आता आणखी दृढ झाला आहे. पण तो असा धोकेबाजपणा कां करतो आहे? त्याच्या या वागण्यामागे काय उद्देश असेल, हे लक्षांत येत नाही. उग्रसेनाने आपल्याकडे कैद्यांना कशासाठी पाठवले?’’
‘‘महाराज, मला वाटते या प्रकारामागे मोठे कटकारस्थान असावे. इतकेच नव्हे तर मला असेही वाटते कीं, शशिकांत अजूनही जिवंत आहे’’ महामंत्री गंगाधर म्हणाला. ‘‘शशिकांत सुखरूप परत यावा, असे मलाही वाटते. आपला भद्र घायाळ होऊनही राजधानीला परत आला आहे, हे बहुधा उग्रसेनाला माहीत नसावे. या दूतांच्या बोलण्यावरून असे वाटते कीं, तिघेही जंगलातच मरण पावले, असा त्यांचा समज झाला आहे.’’ शतमानू म्हणाला.
‘‘इथे येण्यापूर्वी प्रत्येक दूताला असेच वाटत असणार. परंतु आता नगरवासियांच्या चर्चेतून भद्र इथे पोचल्याचे त्यांना समजेल. तेव्हां, भद्रच्या पाठीतून बाण काढताक्षणींच तो मरण पावला, असे मी जाहीर करून टाकतो’’ गंगाधर म्हणाला. ‘‘त्याचा काय उपयोग होईल?’’ शतमानूने विचारले. ‘‘ही बातमी दूतांकरवी, किंवा या ना त्या प्रकारे उग्रसेनाला समजेलच. मग, जंगलात काय घडले ते आपल्याला समजले नसणार,या भ्रमांत तो राहील आणि ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
महाराज, मारेकरी म्हणून ज्या कैद्यांना आपल्यासमोर आणले होते, त्यांचीही माहिती काढायला हवी. ते सर्व मी पहातो. आता खूप उशीर झाला आहे, तेव्हां शयनकक्षात जाऊन आपण विश्रांती घ्यावी’’ असे म्हणून गंगाधर राजाला प्रणाम करून दरबारांतून बाहेर पडला. तिथे असलेल्या पहारेकर्‍यांपैकी एकास बोलावून त्याने सांगितले, ‘‘तुमच्या सरदाराला बोलावून आण.’’
उग्रसेनाचे दूत राजवाड्यांतून बाहेर पडून नगरांत आले. राजमार्गावरील एका झाडाखाली चार घोडे बांधलेले होते. त्यावर दूत स्वार झाले आणि कैद्यांना आपल्या पाठीला दोर्‍यांनी बांधून जीनवर टाकून ते निघाले. घोड्यांना बांधलेल्या अवस्थेत दोन्ही कैदी दूतांच्या मागोमाग जात होते. तोपर्यंत खूप रात्र झाली होती. नगरांत संपूर्ण शांतता होती. अगदी एखादादुसरा नागरिक आणि गस्त घालणार्‍या कांही शिपायांशिवाय त्यांना दुसरे कोणीही दिसले नाही. 
भद्र जिवंत आहे, कीं मरण पावला आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. कदंब राज्यांतून निघताना त्यांना वाटले होते कीं, बाणामुळे घायाळ झालेला भद्र घोड्यावरून वाटेत कुठेतरी पडून मरण पावला असेल. परंतु कुंतलमधे आल्यावर त्यांच्या कानावर आले कीं, तो घायाळ तरुण राजमहालापर्यंत पोंचला आहे. तो बोलूं शकला तर सत्य सर्वांनाच कळेल. आणि त्यांचे सर्व प्रयत्न पाण्यांत जातील. तेव्हां केवळ कदंबनरेशावरच नव्हे, तर संपूर्ण राज्यावर संकट ओढवेल. कुंतल राज्याने कदंब राज्यावर आक्रमण केले तरी ती आश्चर्याची बाब ठरणार नाही. दूत नगराच्या मुख्य दरवाज्याजवळ आले. तिथल्या पहारेकर्‍यांना त्यांनी नगररक्षकाने दिलेले परवानापत्र दाखवले.
‘‘मंत्र्यांच्या मुलाचा मित्र घायाळ होऊन या नगरांत पोंचला आहे. त्याच्या पाठीत बाण घुसला होता. तरीही तो इतक्या दूरवर कसा पोचूं शकला, ह्याचे आश्चर्य वाटते’’ एकजण म्हणाला. ‘‘त्या घायाळ तरुणाचे नांव भद्र आहे. तो पोलादासारखा टणक होता. पण काय उपयोग? तो बाण बाहेर काढला आणि त्याचा उरलेसुरला प्राणही गेला.’’ पहारेकरी म्हणाला. ‘‘अरेरे! बिचारा!...’’ दूत खोट्या सहानुभूतीने  म्हणाले. मग नगरातून बाहेर पडून ते जंगलाच्या दिशेने निघून गेले. भद्रच्या मृत्यूची वार्ता ऐकून ते खूप आनंदी झाले होते.
‘‘आपले महाराज व मंत्री जे कांही करतात त्याला तोड नाही. मंत्री म्हणजे काय किरकोळ माणूस आहे? कैद्यांना पुढे करून आपल्या महामंत्र्यांनी केवळ महाराजांनाच नव्हे तर संपूर्ण राज्याला वाचवले आहे. ते उडत्या कबूतरांची पिसे मोजू शकतील !’’ एक दूत म्हणाला. ‘‘अरे, ज्यांचे मरण आले होते, ते मरून गेले आहेत आणि डाव खेळणारे डाव खेळताहेत. त्यांचा प्रश्नच नाही...पण आपण भाग्यवान आहोत’’ आणखी एक दूत म्हणाला.
‘‘मित्रा, कसले भाग्य आहे ते?’’ ‘‘आपण ज्या कामाकरिता आलो होतो ते उत्तम प्रकारे पार पडले आहे. हुशारीने बोलून आपण या देशाचा राजा व मंत्री, दोघांनाही मूर्ख बनविले आहे. त्यामुळे आपले महाराज काय काय बक्षिसे देतील, ते पाहातच रहा !’’ असे म्हणून दूत जोरात हंसला. तोवर झाडाच्या पाठीमागतून आणखी कोणाच्या तरी हंसण्याचा आवाज आला. चारी दूतांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी त्या दिशेने पाहिले तर तिथे कोणीच दिसले नाही. जंगलामधे तर इतक्या प्रकारचे आवाज येत होते. वातावरण थोडे विचित्र व भितीदायकच होते. कधी किंचाळल्याचे, ओरडल्याचे आवाज येत होते. दूत घाबरले.
‘‘आपण इतके आनंदून गेलो होतो की अंवतीभंवतीच्या गोष्टींचा विचारच केला नाही. या जंगलात मोठमोठे डाकू, दरोडेखोर तर राहातातच, पण इथे भूतपिशाच्चेही आहेत. आता तोंड एकदम बंद ठेवून हुशारीने घोडी पुढे दामटा. धूमक व सोमकही घोड्यांसोबत येताहेत ना?’’ असे म्हणून एका दूताने मागे वळून पाहिले. त्याचवेळी दूतांच्या अंगावर झाडांवरून निखार्‍यांचा वर्षाव होऊ लागला. निखारे अंगावर पडल्याने घोडी खिंकाळून चौफेर उधळूं लागली. धूमक व सोमकही त्यांच्यामागून उठत, पडत, फरफटत जाऊ लागले.
कांही वेळाने घोडी थकल्यानंतर ती दूतांच्या पकडीत आली. दूतांपैकी एकाला धूमक व सोमकही त्यांच्याजवळच असल्याचे दिसल्याने समाधानाचा सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘आपण किती नशीबवान आहोत. एवढ्या मोठ्या संकटातून अगदी सहीसलामत सुटलो. आता साक्षात् यमही आपले कांही बिघडवू शकणार नाही.’’
‘‘पण त्याचा काय उपयोग आहे? आपण रस्ता चुकलो आहोत,’’ एकजण खिन्नपणे म्हणाला.
‘‘अरे, चकुलो तर चुकलो. आपला जीव तरी वांचला! हा समोर दिसणारा पर्वत आपल्या राज्यांतच तर आहे’’ आणखी एक दूत म्हणाला. ‘‘हो, तुमच्या राज्यांतच आहे. तुम्ही कदंब राजाचे दूत आहात का? ठीक आहे. चला माझ्यासोबत. मी कुंतल राज्याच्या सीमेवरील शिपाई आहे. तो समोरचा महावृक्ष कुंतल व कदंब राज्यांच्या सीमारेषेवरच आहे. तिथे उभे राहून तुम्ही खाली पाहिले, तर पुढचा रस्ता स्पष्टपणे दिसेल’’ शिपाई म्हणाला.
शिपाई रस्ता दाखवूं लागला व त्याच्यामागून दूतांनी आपली घोडी नेली. सर्वजण त्या महावृक्षाजवळ पोचले. तिथे आणखी एक सैनिक तलवार घेऊन उभा होता.
‘‘तो पांढरा-पांढरा, वळवळणार्‍या सापासारखा काय प्रकार आहे? तो पहाडी ओढा आहे कां?’’ एका दूताने विचारले. पहारेकरी सैनिक त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणारच होता इतक्यांत झाडाच्या फांदीवरून कसलातरी आवाज आला. दूत भीतीने गारठले. त्यांनी मान वर करून पाहिले. ‘‘हे तर अजगर वाटताहेत’’ असे म्हणून त्यांनी घोड्यांना टांच मारली.
इतक्यांत वरून दोन दोरीचे फांस आले व ते दोन दूतांच्या गळ्यांत पडले. ते दोघे ज्या घोड्यांवर बसले होते, ती घोडी पुढे निघून गेली. हातांत तलवार असलेल्या शिपायाने धूमक व सोमकला बांधलेली दोरी तोडली. इतर दोन्ही दूत भीतीने किंचाळत, कशीबशी घोडी सांभाळत पर्वताच्या दिशेने धावले आणि ज्यांच्या गळ्यात फांस पडला होता. ते क्षणभरच ओरडले नि मग फांदीला लटकले. ‘‘पळणार्‍या त्या दोघांना, ते ओढ्याजवळ पोंचण्यापूर्वीच पकडा.’’ कोणीतरी ओरडले. ताबडतोब झाडांमागून कुंतल देशाचे सैनिक बाहेर आले आणि ते कदंब राज्याच्या दूतांवर बाणांचा वर्षाव करू लागले.                   (क्रमशः)

No comments:

Post a Comment